ओठांची शस्त्रक्रिया

March 2, 2009 1:18 PM0 commentsViews: 85

ओठांची शस्त्रक्रिया

स्माईल पिंकीला ऑस्कर मिळालं आणि त्यानिमीत्तानं दुभंगलेले ओठ आणि टाळूचं व्यंग ही समस्या चर्चेत आली. हाच विषय घेऊन टॉक टाईममध्ये ओठांची शस्त्रक्रिया या विषयावर चर्चा करण्यासाठी प्लॅस्टिक आणि कॉस्मॅटिक सर्जन डॉ.मेधा भावे आल्या होत्या.साधारणत: गर्भ चौथ्या महिन्यात असताना त्याचा चेहरा तयार होतो आणि तेव्हा काही जनुकीय कारणानं ओठ किंवा टाळू नीट जुळले नाहीत तर हे व्यंग होतं. गर्भावस्थेत असताना आईला सकस आहार न मिळणं, कर्करोग किंवा आकडीचे उपचार चालू असणं किंवा काही प्रमाणात अनुवंशिकता या कारणांमुळे क्लिफ लिप तयार होतो. अशा वेळी या बाळांना दूध पितांना त्रास होऊ शकतो. त्यांच्या पोटात दूध जात नसल्यानं हवा जाऊन पोट मोठं होतं. एरवी ही मुलं सर्वसामान्य मुलांसारखीचं असतात. त्यांना प्रेमाची गरज असते ही मुलं शस्त्रक्रिया करून पूर्णपणे बरी होऊ शकतात. काही वर्ष स्पीचथेरपी घेतली की त्यांना बोलण्याचा प्रॉब्लेमही दूर होतो. अशा मुलांचा आहार, व्यायाम यांच्याकडे काही वर्ष जास्त लक्ष दिलं तर पुढे ही मुलं सर्वसामान्य आयुष्य जगू शकतात.अशा शस्त्रक्रियांसाठी साधारणत: 5-8 हजारापासून ते 60-70 हजारांपर्यत खर्च येऊ शकतो. या व्यंगावर पूर्णपणे उपचार होऊ शकतो. समाज आणि पालकांचं प्रेम यांच्या जोडीला डॉक्टरी उपचार मिळाले तर असं व्यंग असलेल्या अनेक पिंकी स्माईल करू शकतील

close