वयात येताना

March 3, 2009 11:53 AM0 commentsViews: 322

आजचा टॉक टाईमचा विषय होता वयात येताना. स्त्री रोगतज्ज्ञ डॉ.अंजली बापट यांनी याविषयी मार्गदर्शन केलं. पाळी येण्यापूर्वी 2 ते 3 वर्षं आधी शरीरातल्या बदलांना सुरुवात होते.मुलींच्या स्तनग्रंथींची वाढ होते. शरीरातल्या बदलांबरोबरच मानसिक बदल होतात. वजनात फरक पडतो. कधी चिडचीड होते कधी हळवेपणा जाणवतो.पाळी साधारणपणे 28 ते 35 दिवसांनी येते आणि स्त्राव साधारण 5 ते 7 दिवस होणं हे नैसर्गिक आहे. व्हाईट डिस्चार्ज होणं हेदेखील नैसर्गिक आहे 18 वर्षांपर्यंत पाळी आली नसेल तर मात्र वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती डॉ. अंजली बापट यांनी दिली. मुलींमध्ये जेव्हा असे नैसर्गिक बदल होतात तेव्हा आईवडिलांनी त्यांच्याशी मित्रत्वाच्या नात्यानं वागणं गरजेचं असल्याचं मत कार्यक्रमात डॉ. अंजली बापट यांनी मांडलं. कार्यक्रमात मुलींच्या आणि पालकांच्या नात्यांविषयी बोलताना डॉ. अंजली बापट सांगतात, " यावेळी आई -वडिलांनी मित्रत्वाच्या नात्यानं समजावून सांगणं गरजेचं आहे. खास करून आईनं मैत्रिणीच्या भूमिकेत असणं जास्त गरजेचं आहे." मुली वयात येतात तेव्हामुलांविषयी आकर्षण वाटणं हे स्वाभाविक आहे. याचवेळी शाळांमधून सेक्स एज्युकेशनची माहिती मुलींना देणं गरजेचं आहे. कारण ही मुला-मुलींच्या शंकांचं निरसन होणंही तितकचं महत्त्वाचं असल्याचं डॉ. अंजली बापट म्हणाल्या. शरीरातल्या बदलंबरोबरच सॅनिटरी नॅपकिन्सबाबत योग्य माहिती असणं आवश्यक आहे. स्वच्छता खूप महत्त्वाची कारण अस्वच्छतेमुळे जंतूसंसर्ग होऊ शकतो. या वयात प्रेम आणि आकर्षण यातला फरक सांगणं गरजेचं आहे, त्यामुळं मुलींना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे, असा सल्ला डॉ. अंजली बापट यांनी दिला. कार्यक्रमात अंजली बापट यांनी आहाराचं महत्त्वही सांगितली. खाण्याच्या पद्धतीत व्हिटॅमिन्स A,E,आणि Cचा वापर असावा.भरपूर पाणी प्या. फळं,पालेभाज्यांचा वापर अधिक ठेवा. जंक फूडची आवड असणं ठीक आहे.पण ती प्रमाणात असावी. आठवड्याचे 6 दिवस घरचं सकस अन्न खाल्लं तर एक दिवस थोडं जंक फूड खाल्लं तर चालेल, असं वयात येणा-या मुलींच्या आहाराचं मूल्यमापन डॉ. अंजली बापट यांनी केलं. वयात येताना हा टॉक टाइमचा विषय पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close