पिलिभीतचा गांधी

April 9, 2009 3:56 PM0 commentsViews: 11

पिलिभीत… हे नाव अचानक चर्चेत आलं. आता वरुण गांधी आणि पिलिभीत हे समीकरण बनलंय. वरूण गांधी यांनी धामिर्क तेढ वाढवणारं प्रक्षोभक भाषण केलं आणि निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई केली. वरूण गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य पिलिभीतमध्येच का केली? उत्तरप्रदेशमधल्या पिलिभीत जिल्ह्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती कशी आहे? याचा उहापोह 'पिलिभीतचा गांधी'मध्ये करण्यात आला आहे.

अल्पसंख्यांक समाज हा पूर्वीपासून समाजवादी पक्षाचा मतदार आहे. पण अलिकडे मायावतीही ही मतं मिळवण्याचा जोरदार प्रयत्न करताहेत. त्यामुळे मुसलमानांची मतं या दोन पक्षांत विभागली जाण्याची शक्यता आहे. वरूण गांधीच्या भाषणामुळे त्यांना हिंदू मतं मिळण्याची शक्यता आहे. किंबहुना हिंदूची मतं विभागली न जाता एकगठ्ठा मिळाली तरच विजय शक्य आहे हे लक्षात घेऊनच वरूणनी हे भाषण केलं असल्याचं जाणकार सांगतात. पण वरूण निवडून येतील का ? या प्रश्नाचं उत्तर फक्त पिलिभीतमधले मतदारच देऊ शकतात.

हिंदू मतं मिळवण्यासाठी भाजप आणि संघ परिवाराला वरूण गांधी यांच्या सळसळत्या रक्ताचा फायदा झाला. सहिष्णुता आणि शांतता हे मूल्य मांडणार्‍या गांधीच्या घराण्याचे वारसदार वरूण गांधीनी मात्र हिंसेचा जयघोष केला. एक नवा तरूण नरेंद्र मोदी सापडला म्हणून भाजपात आनंदाचं वातावरण आहे. येणारं दशक राहूल गांधींचं असेल असं आतापर्यंत वाटत होतं. या निवडणुकीवर राहुल गांधींच्या तारुण्य आणि उमेदीच्या चेहर्‍याची छाप असेल असं आतापर्यंत वाटत होतं. पण आता या वरुण गांधी नावाच्या वादळानं राजकीय क्षितीजावर धुळीचे ढग निर्माण केले आहेत ज्यात कसलाच अंदाज बांधता येत नाही. वरूणचा पिलिभीतमध्ये विजय झाला तर भाजपमध्ये त्यांचं स्थान भक्कम होईल. पण पिलिभीतचा हा गांधी देशाला कुठल्या दिशेने नेईल या प्रश्नाचं उत्तर अंगावर काटा आणणारं आहे. पिलिभीतचा गांधी हा रिपोर्ताज पाहण्यासाठी सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करा

close