त्यागराज खाडिलकरांशी सुरेल गप्पा

April 10, 2009 2:10 PM0 commentsViews: 2

माझ्यातला संगीतकार बर्‍याच दिवसांनी 'मस्त इज मस्ट' या मराठीतल्या आल्बममुळे जागा झाल्याचं सांगून गायक त्यागराज खाडिलकर यांनी आजच्या 'सलाम महाराष्ट्र'ची सकाळ सुरमयी केली. घराण्यात गायकी असल्यामुळे आपसूकच गाता गळा लाभलेल्या त्यागराज खाडिलकर यांनी यावेळी तरूणाईसाठी काहीतरी हटके करायचं ठरवलं आणि 'मस्त इज मस्ट' आल्बम साकारला. या आल्बममध्ये 'तारुण्य येतंच नकळत दिलकी गिटार छेडत', 'साला नशिबानं गंडवलंन खराब बॅडलकनं लटकवलंन' अशी मराठीतही पंच, झिंग, बिट्स यांचा सुरेल मिलाफ असणारी गाणी मराठीचा बाज कायम राखून त्यागराज यांनी केली आहेत. तर 'पाऊस बरसतो रिमझिम' सारखी तरूणांना आवडतील अशी प्रेमगीतंही या आल्बमचं खास आकर्षण आहे. भावगीत, शास्त्रीय संगीत आणि हार्ड रॉक यांची नजाकतही या आल्बममधे अनुभवायला मिळेल अशी संगीतरचना करण्यात आली आहे. 'संगीत ही कला आहे. ती प्रत्येक कलाकाराची शैली असते. 'संगीतातला कोणताही प्रकार उच्च किंवा नीच नसू्‌न तो आत्मसात करणार्‍या गायकाची खासियत असते' असं सांगून त्यागराज यांनी आपल्या आल्बममधून मराठी संगीताला नवा चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे. संगीतातला सूर जसा गवसतो तसाच जीवनाचा सूरही प्रत्येकाला सापडला तर सगळ्यांचंच जीवन सुरेल होईल, असा मस्त आणि मस्ट संदेशही त्यागराज खाडिलकर यांनी यावेळी दिला.

close