पंतप्रधानांनी मागितली जनतेची माफी

December 11, 2008 3:58 PM0 commentsViews: 2

11 डिसेंबर, नवी दिल्ली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ला रोखू न शकल्याबद्दल आज पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी देशातील जनतेची माफी मागितली. ते लोकसभेत मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या विशेष अधिवेशनात बोलत होते. 'पाकिस्ताननं दहशतवाद्यांविरोधात पावलं उचलली आहेत पण त्यांनी अधिक कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. आज दिवसभर संसदेच्या दोन्ही सभागृहात झालेल्या चर्चेत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी जनतेच्या नाराजीची दखल घेतली. प्रत्येक मुद्यावरून एकमेकांना धारेवर धरणारे सत्ताधारी आणि विरोधक पहिल्यांदाच एकाच सुरात बोलताना देशानं पाहिले. दहशतवादाच्या मुद्यावर आपण सर्व एक आहोत, असं प्रत्येकानं आज ठासून सांगितलं. अखेरीस मुंबईतल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध करणारा ठराव लोकसभेत एकमुखानं संमत करण्यात आला.मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर सर्वसामान्य माणूस राजकारण्यांवर चांगलाच चिडलाय. कदाचित याची कल्पना आल्यानेच सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकमुखाने दहशतवादाचा धिक्कार केला. ' ही स्थिती युद्धापेक्षा कमी गंभीर नाही.. या घडीला आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत', असं लालकृष्ण अडवाणी यावेळी म्हणाले.लोकांच्या भावनांशी आपण पूर्णपणे सहमत असल्याचं राहुल गांधीनी वारंवार भाषणात सांगितलं. भारतीय संसदेत दिसलेली ही एकी पाकिस्तानावर दबाव आणण्यासाठी सरकारला नक्कीच बळ देईल.

close