‘मतदान करायला जाताना कोणती खबरदारी घ्यावी ‘

April 15, 2009 2:31 PM0 commentsViews: 18

15 एप्रिल

उद्या निवडणूक…मतदान करायला जाताना कोणती खबरदारी घ्यावी…काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत याबाबात मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई युनिव्हसिर्टीच्या मास कम्युनिकेशनचे प्राध्यापक मंगेश करंदीकर आले होते…मतदानाबाबत त्यांनी लोकांना काही महत्वाच्या टिप्स दिल्या…

आपलं नाव मतदान यादीत आहे का, नाही हे सर्वात आधी तपासलं पाहिजे तेच जर नसेल तर आपण मतदान करु शकत नाही. जर वोटर आय कार्ड नसेल तर रेशन कार्ड,ड्रायव्हिंग लायसन्सही चालू शकतं.आपलं मत नोंदवण्याआधी वोटिंग मशीनची पूर्ण माहिती करुन घ्या. निवडणुकीला उभे असलेल्या उमेदवारांनी आत्तापर्यंत केलेलं काम, त्याचं शिक्षण, त्यांना आपली राज्यघटना, कायदे या सगळ्यांचं बेसिक शिक्षण आहे का ते तपासलं पाहिजे. यासाठी अनेक राजकीय पार्टीच्या वेबसाईट असतात,पक्षांचे जाहिरनामे असतात त्याचा थोडा अभ्यास करावा कारण आपलं मत हे योग्य उमेदवाराला जात आहे का हे पाहणं आपलं काम आहे. एखाद्या पक्षाची विचारसरणी, त्याचं काम पाहण्यापेक्षा आपल्या मतदार संघात जो उमेदवार उभा आहे त्यानं आत्तापर्यंत केलेलं काम लक्षात घ्यावं. असा सारासार विचार करुन मगच मत द्यावं.

ग्रामीण आणि शहरी भागातील विकासाचे निकष,समस्या वेगवेगळ्या असतात.अनेकदा अनेक उमेदवार प्रसिध्द असतात,फिल्मस्टार असतात अशा वेळी त्यांच्या प्रसिध्दीला न भुलता ते आपल्या भागातील प्रश्न सोडवू शकणार आहेत का, हा विचार करावा.

मतदान केंद्रावर काही आक्षेपार्ह गोष्ट आढणळल्यास ताबडतोब इलेक्शन अधिकार्‍याच्या लक्षात आणून द्या.लोकांनी जर संघटित होऊन तक्रार केली तर त्यांना नक्की न्याय मिळतो.लोकशक्तीच्या पुढे कोणतीही यंत्रणा टिकू शकत नाही असा खूप महत्त्वाचा मुद्दा त्यांनी यावेळी सांगितला.

तुमच्या मतदार संघात जर कोणताच उमेदवार निवडून येण्यास लायक नाही असं जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही 17 A या फॉर्मचा वापर करु शकता.मतदान केंद्रावर हा फॉर्म उपलब्ध असतो.माझं मत मी कोणालाही देऊ इच्छित नाही कारण मला कोणताही उमेदवार लायक वाटत नाही असं नमूद करुन तुम्ही हा फॉर्म भरु शकता.जर 40%पेक्षा जास्त लोकांनी या फॉर्मचा वापर केला तर राजकीय पक्षासाठीदेखील तो वेक अप कॉल असतो.आपण केलेलं काम लोकांना आवडत नाही असा त्याचा अर्थ होतो.हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा प्राध्यापक करंदीकर यांनी सांगितला. आपला नेता कोण असावा, हे ठरवण्याचा अधिकार आपल्यालाच असतो आणि आपण तो अधिक चांगल्या पध्दतीनं वापरला पाहिजे.

या काही उपयुक्त वेबसाईट्स ज्यावर उमेदवार, निवडणुकांची माहिती मिळू शकते -www.voteindia.inwww.vote4thane.com

close