आवाज कुणाचा भाग 2

April 21, 2009 11:23 AM0 commentsViews: 19

आवाज कुणाचा या कार्यक्रमाचा दुसरा भाग लोकसभा निवडणुकीच्या मोसमात खास विदर्भाच्या जनमानसाचा कौल तपासून पाहण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. इथल्या सध्याच्या परिस्थितीत मतदार खुष आहेत की नाराज आहेत हे जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे माजी खासदार – प्रकाश जाधव, बहुजन समाज पक्ष नेते – उत्तम शेवडे, राज्याचे गृहराज्य मंत्री – डॉ. नीतिन राऊत, नागपूर भाजपा नेते – बनवारीलाल पुरोहित, आक्रमक आणि सजाग कार्यकर्ते प्रा. जोगेंद्र कवाडे आणि ख्यातनाम सामाजिक कार्यकर्त्या सीमाताई साखरे या प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

गेल्या लोकसभा निवडणुकीत 10 पैकी 9 जागांवर शिवसेना बीजेपीचं राज्य होतं त्यावेळी काँग्रेसचा धुव्वा उडाला होता. गेल्या पाच वर्षांमधे या पक्षांनी काही ठोस भूंमिका घेतली होती का? याचा आढावा या कार्यक्रमात घेण्यात आला.

विदर्भ महाराष्ट्रातून वेगळा करावा का ? की एकोप्याने राहून शेतकर्‍यांच्या आत्महत्या, खैरलांजीसारखे दलितांवर होणारे अमानुष अत्याचार, पाण्याचा प्रश्न, मिहान प्रकल्पासारखी समस्या, लोडशेडिंग, अर्बनायझेशन, भ्रष्टाचार यांसारख्या प्रश्नांमागची कारणं आणि त्यावर योग्य उपाययोजना राबवल्या जातात का? याविषयी चर्चा करण्यात आली.

विदर्भाचा विकास होत नाही, विदर्भावर अन्याय होतो याला विदर्भातले नेतेच कारणीभूत आहेत की इतर कोण ? पक्षांतर्गत राजकारणात वैयक्तिक स्वार्थासाठी जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून राजकारणी आपले इमले तर रचत नाहीत ना ? या प्रश्नांचा छडा लावण्यात आला.

वीज, पाणी, बेरोजगारी, दलितांची सुरक्षेचा प्रश्न,यवतमाळमधील शेतकर्‍यांच्या आत्महत्येचं वाढतं प्रमाण या समस्यांनी ग्रासलेल्या जनतेनेही चिडून यावेळी राजकीय पक्षांना थेट सवाल केले. – नागपूरचे नॉन कन्वेन्शनल मिनिस्टर देशाचे मिनिस्टर असतानाही लोडशेडिंगच्या समस्येवर एक मेगावॉट वीजही जनरेट करू शकले नाहीत का ? अशी विचारणा करण्यात आली. – राजकारणात आपसात पक्षांतर करून जनतेकडून मतंपरिवर्तनाची अपेक्षा कशी करता? – विदर्भ वेगळा करण्याऐवजी सर्व राजकीय पक्ष एकजुटीने काम का करत नाही ? कामाच्या श्रेयापेक्षा जनतेला मूलभूत गरजा कशा पूर्ण करता येतील याचा विचार करण्यासाठी आग्रह धरण्यात आला. – अपंगांसाठी निर्वाह भत्ता वाढवण्याबद्दल विचारणा केली असता तो वाढवण्यात येणार असून त्याचा जीआरही निघाल्याची माहिती देण्यात आली. – केंद्रसरकार आणि राज्यसरकार यांनी रोजगार हमी योजना प्रामाणिकपणे राबवाव्यात अशी मागणी करण्यात आली. – सत्तेसाठी एकमेकांचे पाय खेचणार्‍या पक्षांची वागणूक आणि दुटप्पी भूमिका पाहून नेता अभिनेता बनले आहेत त्यामुळे राजकीय पक्षांना यापुढे लायडिटेक्टरवर बसवून प्रश्न विचारले पाहिजेत असा सवाल करण्यात आला.

निवडणुकीच्या काळात आणि नंतरही नेत्यांना न घाबरता प्रश्न विचारा असं आवाहन करून या कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.

close