मासिक पाळी जाताना…

May 14, 2009 5:45 PM0 commentsViews: 402

14 मार्चच्या टॉक टाईमचा विषय होता मासिक पाळी जाताना. याविषयावर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अलका गोडबोले यांनी मार्गदर्शन केलं.पाळी सुरू होण्याबद्दल जेवढी उत्सुकता असते तेवढी उत्सुकता पाळी बंद होणं या एका महत्त्वाच्या बदलाबद्दल नसते. कित्येक स्त्रियांनादेखील आपल्या शरीरात होणार्‍या बदलांची माहिती नसते. साधारणत: चाळीशीनंतर दर महिन्याला न चुकता येणारी पाळी अनियमीत होऊ लागली की मेनोपॉजला म्हणजेच पाळी बंद होण्याच्या प्रकियेला सुरुवात झाली असं समजावं. या अतंत्य नाजूक पण महत्त्वाच्या विषयावर ' मासिक पाळी जाताना…' या टॉक टाईममधून मार्गदर्शन करण्यात आलं. स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ.अलका गोडबोले यांनी मार्गदर्शन केलं. 40 नंतरच्या वयात साधारणत: कोणत्याही गृहिणीची मुलं मोठी होऊन आपापल्या करिअरमध्ये गुंतलेली असतात. नवरा त्याच्या कामामध्ये असतो. बायको आणि आईसाठी कोणालाच वेळ नसतो. अशा वेळी तिला असुरक्षित वाटणं, सतत चिडचिड होणं, रडायला येणं स्वाभाविक आहे. आणि त्यातच शरीरातल्या हार्मोन्सच्या बदलामुळे तिला शारीरिक त्रासही होत असतो. अशावेळी तिला घरच्यांनी सांभाळून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. शिवाय योग्य डॉक्टरचा सल्ला घेणंही गरजेचं आहे. आपल्या आहारात कॅल्शिअमचा वापर वाढवला पाहिजे. त्यासाठी आहारात नाचणी, बाजरी, दही, मासे यांचा समावेश वाढवला पाहिजे, असा सल्ला डॉ. गोडबोलेंनी दिला. कार्यक्रमात त्या शेवटी असं म्हणाल्या की, एक लक्षात ठेवलं पाहिजे की पाळी येणं किंवा जाणं हा आपल्या आयुष्यातील एक भाग आहे. तेव्हा व्यायाम करा, चांगली पुस्तकं वाचा आणि आपलं आयुष्य अधिक चांगल्या पध्दतीनं जगायला शिका.

close