मुलांचे हट्ट

May 20, 2009 11:54 AM0 commentsViews: 56

20 मेच्या टॉक टाईमचा विषय होता मुलांचे हट्ट. याविषयावर कौन्सिलर उर्मिला सावंत यांनी मार्गदर्शन केलं.

कधी चॉकलेट तर कधी महागडा खेळ, कधी कपडे तर कधी टी.व्ही. बघण्याचा हट्ट… आपल्या मुलांच्या या रोजच्या हट्टाने आपण सगळेच त्रासलेलो असतो. मुलांचे हट्ट पुरवायचे की नाही ते किती प्रमाणात पुरवायचे आणि त्यांना नेमकी शिस्त कशी लावायची यावर 'मुलांचे हट्ट ' या 'टॉक टाईम'मध्ये कौन्सिलर उर्मिला सावंत यांनी सांगितलं.

मुळातच लहान मुलांमध्ये इच्छा झाली की ती मागणी लगेच पूर्ण झाली पाहिजे ही वृत्ती उपजतच असते. त्यामुळे या सवयीला योग्य वळण लावण्याचं काम असतं पालकांचं.पालकांनी आपली भूमिका ठरवून घेतली पाहिजे. एखादी वस्तू जर आपण कबूल केली असेल तर ती मुलाला दिली पाहिजे. जर आपलं उत्तर नाही असेल तर त्याचं योग्य शब्दांत स्पष्टीकरण मुलाला सांगता आलं पाहिजे. आपले आई-वडील कष्ट करतात, आपली आर्थिक परिस्थिती या सर्वांचं भान आणि जाणीव मुलाला असावी. शिवाय लोकं काय म्हणतील या विचाराने मुलांचे हट्ट पुरवता कामा नये. मुलांच्या रडण्याचा बाऊ न करता त्यांना योग्यपध्दतीने हाताळलं पाहिजे. मात्र हिंसा ही शिक्षा होऊ शकत नाही, असंही उर्मिला सावंत म्हणाल्या.

खूपदा लहान भावंडामुळे मोठ्या मुलाला असुरक्षित वाटतं. दोन मुलांच्या भांडणात पालकांनी आपला रोल ठरवला पाहिजे. नाहीतर मानसिक त्रास होऊ शकतो, असंही उर्मिला सावंत म्हणाल्या.

मुलांच्या हट्टाचं मूळ शोधण्याचा प्रयत्न करा. मुलांनी हट्ट करू नये यासाठी त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्यासमोर असंख्य नवे पर्याय ठेवले पाहिजेत. मात्र हे सगळं करताना पालकांनी संयम बाळगला पाहिजे. तसंच जो नियम, शिस्त मुलांना तेच नियम आणि तीच शिस्त पालकांनीही पाळली पाहिजे.

close