चव्हाणांची राजकीय कारकीर्द

November 9, 2010 5:42 PM0 commentsViews: 12

09 नोव्हेंबर

आदर्श घोटाळ्याप्रकरणी अखेर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. मुंबई हल्ल्यानंतर विलासराव देशमुखांना खुर्ची सोडावी लागली आणि त्यांच्या जागी अशोक चव्हाणांना संधी मिळाली.

त्यानंतर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला भरघोस यश मिळाले. आणि चव्हाणांची खुर्ची पक्की झाली. पण त्याला आदर्शचे ग्रहण लागले. आणि चव्हाणांना पद सोडावे लागले. त्यांच्या या चढउताराच्या कारकीर्दीवर एक नजर…

अशोक चव्हाण…दोन वर्षांपूर्वी होते महाराष्ट्रातल्या काँग्रेसचा तरुण चेहरा…. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र…. वडील आणि मुलगा मुख्यमंत्री बनण्याचा विक्रम त्यांच्या नावावर जातो. आता परिस्थिती बदलली.

आदर्श सोसायटी घोटाळा उघडकीला आल्यानंतर पक्षाला कलंक लावल्याप्रकरणी त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणे भाग पडले.

मुंबई हल्ल्यानंतर विलासराव देशमुख यांचे मुख्यमंत्रीपद गेले. आणि त्यांच्या जागी आले अशोक चव्हाण. स्वच्छ चारित्र्याचे नेते म्हणून त्यावेळी त्यांची ओळख होती.

काँग्रेसमधल्या सर्व नेत्यांसोबत त्यांचे संबंधही चांगले होते. विलासराव देशमुखांचाही त्यात समावेश होता. विलासरावांनीच अशोक चव्हाणांची पहिल्यांदा कॅबिनेट मंत्रीपदी बढती केली होती.

पण चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्यातले संबंध दुरावले. आदर्श घोटाळ्यानंतर त्यात आणखी भर पडली.

हायप्रोफाईल नेता बनण्यापूर्वी अशोक चव्हाण यांनी पक्षाचा साधा कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली. 1987 मध्ये नांदेडमधून त्यांनी लोकसभेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.

पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतरही निवडणुकीनंतर त्यांची खुर्ची कायम राहील का याबाबत शंकाच होती. पण त्यांच्या नेतृत्वाखाली 2009 च्या निवडणुकीत काँग्रेसने उत्तम कामगिरी केली.

आणि त्यांच्याबद्दलच्या शंका दूर झाल्या पण मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या दुसर्‍या टर्मला एक वर्षं पूर्ण होत असतानाच आदर्श घोटाळा उघडकीला आला. आणि अशोकरावांची खुर्ची गेली.

घोटाळ्याचा ठपका बसलेल्या मुख्यमंत्र्याला पुन्हा संधी द्यायची नाही, अशी काँग्रेसची परंपरा आहे. आणि पुढच्या राजकीय प्रवासात अशोकरावांसाठी नेमकी हीच गोष्ट अडचणीची ठरणार आहे.

close