दहशतवादाविरोधात मुंबईत मानवी साखळी

December 12, 2008 1:07 PM0 commentsViews: 4

12 डिसेंबर, मुंबईदहशतवादाविरोधात लाखो मुंबईकर आज रस्त्यावर आले. दहशतवाद्यांनी लक्ष्य केलेल्या ताज हॉटेलपासून ते दहिसरपर्यंत मानवी साखळी आयोजित करण्यात आली होती. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा निषेध या मानवी साखळीत सहभागी झालेल्या लाखो मुंबईकरांनी केला. सरकारी तसंच विविध कंपन्यांची कार्यालयं असलेला दक्षिण मुंबईचा भाग आज दहशतवादाविरोधातील मानवी साखळीमुळे गजबजून गेला होता. शंभरहून अधिक एनजीओ संघटना यात सहभागी झाल्या होत्या. बेस्ट भवन, रिगल सिनेमा, ताज हॉटेल या परिसरात लांबच लांब मानवी साखळीचं दृश्य दिसत होतं. दुपारी 12 वाजता दक्षिण मुंबई ते दहिसरपर्यंत एकाच वेळी मानवी साखळीला सुरुवात झाली. लोक उत्सफूर्तपणे या मानवी साखळीत सहभागी झाले. हातात बॅनर्स घेऊन दहशतवादाविरोधात आम्ही एकत्र आहोत, असा संदेश मानवी साखळीतून दिला जात होता. एअर इंडिया, मुंबई पोर्ट ट्रस्ट, इन्स्टिटीट्यूट ऑफ चार्टड अंकाऊंट, केसरी टुर्स यासह विविध कंपन्यांचे कर्मचारी यात सहभागी झाले होते. शाळकरी मुलांची उपस्थितीही मोठ्या प्रमाणात होती. दुपारी 12 ते 12.15 वाजेपर्यंत ही मानवी साखळी होती. या मानवी साखळीत प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर ही सहभागी झाले होते. ' दहशतवादाचा निषेध कँडल लाईट मार्चच्या पुढे गेला आहे. आता अ‍ॅक्शन घेण्याची वेळ आली आहे. आपण आता जागे झालो नाही तर कधी होणार ? ', असं जावेद अख्तर म्हणाले. दहशतवादाविरोधात आमची एकजुटीनं लढण्याची तयारी असल्याची भावना मानवी साखळीत सहभागी झालेल्या प्रत्येक मुंबईकरांची होती. या साखळीतून ' शांततेसाठी मुंबई ' हा संदेश दिला गेला. दहशतवादी हल्ले झाले तरी आमची एकात्मता अतूट आहे, तसंच आम्हाला युद्ध नकोय अशीही प्रतिक्रिया लोकांमधून उमटत होती.

close