सचिनसमोर पुढील टार्गेट

April 24, 2011 10:38 AM0 commentsViews: 20

24 एप्रिल

वीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत बॅटिंगचे सगळे रेकॉर्ड सचिनने आपल्या नावावर केले. नजिकच्या काळात इतर कोणी बॅट्समन त्याच्या जवळ पोहोचण्याची शक्यताही नाही. पण आजही सचिन बॅटिंगला आल्यावर त्याच्याकडून लोकांच्या अपेक्षा असतातच. सचिनच्या या 38 व्या वाढदिवसी आम्हीही एक आढावा घेतला. सचिनसमोरच्या पुढील टार्गेटचा…

वर्ल्डकप जिंकण्याचे गेली 20 वर्ष उराशी बाळगलेलं स्वप्न पुर्ण झालं आणि सचिनच्या चेहर्‍यावर समाधानाचं हसू पसरलं. वानखेडेवरील भारतीय टीमच्या या विजयोस्तवात अवघा भारत सहभागी झाला होता. वर्ल्डकप विजयापर्यंत सचिननं क्रिकेटमधील अनेक विक्रम मोडित काढले. पण अजुन असेही काही विक्रम आहेत जे त्याला अद्याप खुणावत आहे.

टेस्टमध्ये चारवेळा सचिनने डबल सेंच्युरी केली. पण टेस्टमध्ये सचिन अद्याप ट्रिपल सेंच्युरीला गवसणी नाही घालू शकलेला. वेस्ट इंडिजचा ग्रेट बॅट्समन ब्रायन लाराने ट्रिपल सेंच्युरीची मजल दोनवेळा मारली. आणि एकदा तर त्याने चारशे रन्सचा रेकॉर्ड केला. भारतीय टीममध्येही वीरेंद्र सेगवागने दोन ट्रिपल सेंच्युरी ठोकल्यात. डॉन ब्रॅडमन यांनी सचिन त्यांच्या सारखाच खेळतो अशी पावती सचिनला दिली. खुद्द ब्रॅडमन यांच्याही नावावर एक ट्रिपल सेंच्युरी आहे.

सचिन तेंडुलकर या खेळाडूंच्या यादीत विराजमान होईल का? वन डेत मात्र सचिनने कमाल केली. आजवर अशक्य वाटणारी वन डेतील डबल सेंच्युरी सचिननं ठोकली. अशी किमया करणारा सचिन जगातील एकमेव बॅटसमन आहे.

सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 99 सेंच्युरी केल्या आहेत. टेस्टमध्ये 51 आणि वन डेत 48. त्यामुळेच सेंच्युरीची सेंच्युरी करायला सचिनला हवीय आणखी फक्त एक सेंच्युरी. आणि तसं झालं तर क्रिकेटच्या इतिहासातला सेंच्युरीची सेंच्युरी करणारा तो पहिला बॅट्समन असेल.

टेस्ट आणि वन डेत सचिनने सेंच्युरीचा पाऊस पाडला. यंदाच्या चौथ्या आयपीएलमध्ये टी-20 क्रिकेटमध्ये सेंच्युरी ठोकत टेस्ट, वन डे आणि टी 20 अशा क्रिकेटच्या तीन्ही प्रकारात सचिनने सेंच्युरी ठोकली.

मुंबई इंडियन्स टीमचा कॅप्टन म्हणूनही सचिन चांगली कामगिरी करतोय. गेल्या वर्षी आयपीएलच्या फायनलपर्यंत सचिनच्या मुंबई इंडियन्सने धडक दिली होती. तेथे महेंद्रसिंग धोणीच्या चेन्नई सुपर किंग्जकडून त्याला पराभव पत्कारावा लागला होता. यंदाच्या आयपीएलमध्येही त्याने तुफान कामगिरी केली. त्यामुळे आयपीएलचे विजेतेपद जिंकाव हीच त्याच्या चाहत्यांची सचिनला वाढदिवसाची शुभेच्छा असेल.

close