महाराष्ट्राच्या रणरागिणी

May 3, 2011 2:06 PM0 commentsViews: 129

संयुक्त महाराष्ट्रासाठी 1947 साली सुरु झालेलं आंदोलन प्रामुख्याने छेडलं ते शेतकरी आणि कामगार संघटनांनी. 1948 च्या अखेरीस राज्यांच्या पुनर्रचनेसाठी नेमण्यात आलेल्या दार कमिशनचा अहवाल आला… दार कमिशननं भाषिक राज्यांची मागणी साफ फेटाळली. आणि मुंबई शहराशी महाराष्ट्राचा काडीमात्र संबंध नाही, असंही जाहीर केलं. काँग्रेसच्या कमिटीनेसुद्धा भाषावार प्रांत रचनेला नकार दिला. त्यामुळे साहजिकच देशभर असंतोष पसरला. मराठी भाषिक राज्याची मागणी वेगवेगळ्या मंचावरून केली जाऊ लागली. पण या मागणीला पहिली खिळ बसवली ती फाजल अली कमिशनच्या अहवालानं. महाराष्ट्र-गुजरातचे द्विभाषिक आणि विदर्भाचे वेगळे राज्य करण्याची शिफारस यात करण्यात आली होती.

राज्यभर संतापाचे, निषेधाचे आवाज उठू लागले.. ठिकठिकाणी मोठ्या सभा भरवल्या जाऊ लागल्या गेल्या. सेनापती बापट, एस. एम. जोशी, कॉम्रेड डांगे, प्राचार्य अत्रे, उद्धवराव पाटील, कॉम्रेड दत्ता देशमुख यांनी राज्यभर सभा गाजू लागल्या. यात महिलाही मागे नव्हत्या. अहिल्या रांगणेकर, गोदावरी परुळेकर, दुर्गा भागवत, इस्मत चुगताई, चारुशिला गुप्ते, सुमती गोरे, सुलताना जाफरी, प्रमिला दंडवते, कॉम्रेड तारा रेड्डी यांनी मोर्चे, निदर्शनांमध्ये आघाडी घेतली होती. लोकांच्या भावना तीव्र होत होत्या. पण मुख्यमंत्री मोरारजी देसाईंचा विरोध कडवा होता. त्यांना मुंबई महाराष्ट्राला द्यायची नव्हती.

ठिकठिकाणी सभा होत होत्या, सत्याग्रह होत होते. अहिल्याताई रांगणेकरांना यांना या आंदोलनातीलं उत्तम संघटक असं म्हटलं जातं. सेनापती बापटांसोबत अहिल्याबाईंनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरु केली. प्रत्येक लढ्यात त्या पुढे असत. म्हणूनच आचार्य अत्रेंनी त्यांचा उल्लेख रणरागिणी असा केला.

close