कसाबचं पाकला पत्र

December 13, 2008 1:59 PM0 commentsViews: 1

13 डिसेंबर, मुंबई मुंबई दहशतवादी हल्ल्यात अटक करण्यात आलेला अतिरेकी अजमल कसाब याने पाक दूतावासाला पत्र लिहलंय. या पत्रात कसाबनं आपल्याला कायदेशीर मदत मिळवून देण्याबाबत विनंती केलीय. आपला गुन्हाही त्याने या पत्रात कबूल केल्याचं कळतंय. मुंबई क्राईम ब्रॅचनं हे पत्र परराष्ट्र मंत्रालयाकडे सोपवलंय. कसाबचं पत्र तीन पानी असून ते उर्दूमध्ये लिहण्यात आलंय. या पत्रात त्यानं मुंबई हल्ल्याची कबुली दिलीय. त्याचबरोबर आपण पाकिस्तानी नागरिक असून लष्कर ए तोयबाच्या कारवायांत सहभागी असल्याचं सांगितलंय. पाकिस्तानी अधिकार्‍यांकडून त्यानं कायदेशीर मदतही मागितलीय. पोलिसांच्या कारवाईत ठार झालेला साथीदार इस्माईल खानचा मृतदेह पाकिस्तानी अधिकार्‍यांनी ताब्यात घ्यावा आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार करावेत, अशी विनंतीही त्यानं केलीय. झकीर रहमान लख्वी यानं आपल्याला अतिरेकी कारवायांमध्ये आणलं असं कसाबनं पत्रात म्हटलंय. तसंच लष्करचा प्रमुख हफीज सईद आणि मोहम्मद खफा यांचा प्रशिक्षक म्हणून उल्लेख केलाय.कसाबचं हे पत्र मुंबई पोलिसांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडं सादर केलंय. त्याची पहिल्यांदा पडताळणी करून नंतर पाकिस्तानी उच्चायुक्तालयाकडं पाठवलं जाईल. पाकिस्तानी उच्चायुक्तालयानं आतापर्यंत असं पत्र मिळाल्याचा इन्कार केलाय. तसंच मुंबई हल्ल्यातल्या पाकिस्तानी नागरिकांच्या सहभागाचे पुरावे मागणं सुरूच ठेवलंय. भारतानं मात्र योग्यवेळी योग्य ती माहिती देऊ अशी भूमिका घेतलीय.मुंबईवर हल्ला करणारे अतिरेकी पाकिस्तानी असल्याचा पाकिस्तान वारंवार इन्कार करतंय. पण कसाबच्या वडिलांनी दिलेली कबूली, पाकिस्तानी मीडियानं केलेलं स्टिंग ऑपरेशन आणि आता स्वत: कसाबनं पाकिस्तानला लिहिलेलं पत्र एवढे पुरावे कसाबचं पाकिस्तानी नागरिकत्व सिद्ध करायला पुरेसे आहेत. आता यावर पाकिस्तानी सरकार काय भूमिका घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

close