गर्जा महाराष्ट्र : आयएनटी (इंडियन नॅशनल थियटर)

June 9, 2011 3:25 PM0 commentsViews: 50

इतिहास…. जपून ठेवलेल्या खुणांचा…. जवळपास ६६ वर्षांपूर्वीचा… तो इतिहास ज्याने समृद्ध केला महाराष्ट्राचा आजचा रंगमंच. काळाची चक्र पुन्हा त्या दिशेने फिरतील. तेव्हाच विस्मरणाच्या सावल्या ओलांडता येतील. जुनं पुन्हा नवं होईल तेव्हाच कळेल की या संस्थेच्या तीन आद्याक्षरांची जादू महाराष्ट्रासाठी काय आहे…. आय एन टी… अर्थात इंडियन नॅशनल थिएटर!आय एन टीच्या पहिल्या अध्यक्षा श्रीमती कमलादेवी चटोपाध्याय तर पहिले सचिव रोहित दवे हे होय. पण आय एन टी ख-या अर्थाने नावारुपाला आणली ती दामूभाई जव्हेरी यांनी. दामूभाईंच्या प्रोत्साहनामुळेच आय एन टीने मराठी, हिंदी, गुजराथी, पारशी, कन्नड, आणि इंग्लिशमध्येही नाट्यनिर्मिती केली. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पंडित नेहरुंच्या प्रसिद्ध पुस्तकावर आधारित बॅलेला तर खुद्द पंडितजींनी आपल्या लिखाणापेक्षाही बॅले अधिक प्रभावी झाल्याचं म्हणून दाद दिली होती. बटाट्याची चाळ, ती फुलराणी, कोंडी, छिन्न, कन्यादान, बेकेट, बे दुणे पाच अशा अनेक गाजलेल्या नाटकांची निर्मती आयएनटीने केली. सदाशिव अमरापुरकर, सतीश दुभाषी, पु.ल.देशपांडे, भक्ती बर्वे, शफी इनामदार, श्रीराम लागू, स्मिता पाटील, प्रिया तेंडुलकर अशी अनेक नावं आय एन टी शी जोडली गेली आहेत.

केवळ मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही ज्यांची नावं आदराने घेतली जातात असे दिग्गज नटांनाही त्यांच्या उमेदीच्या काळात आय एन टीच्याच रंगमंचाने आधार दिला होता.गेल्या अडतीस वर्षात आय एन टीचं नाव प्रत्येक महाविद्यालयात सर्वतोमुखी झालं ते या मानाच्या समजल्या जाणा-या फिरत्या चषकामुळे.. १९७२ सालापासून सुरु झालेल्या आय एन टी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांनी महाराष्ट्राला भरभरून कलाकार दिले.प्रत्येक विद्यार्थ्याची म्हणूनच इथे टिकून राहण्याची मोठी कसोटी लागते. असं असलं तरी आय एन टीची स्पर्धा ही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी असते हार जीतीच्याही पलिकडची.

close