जळगावमधील आमदार गिरीश महाजनांवर फौजदारी गुन्हा दाखल

December 13, 2008 4:18 PM0 commentsViews: 2

प्रशांत बाग 13 डिसेंबर, जळगाव जामनेरचे भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झालाय. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मालमत्तेचा खोटा तपशील प्रतिज्ञापत्रात दिला, असं उघड झालंय. आमदार गिरीश महाजन यांच्या विरोधात तहसीलदारांनी गुन्हा दाखल केलाय. याबद्दलच्या तपासात महाजन यांच्यावर संपत्ती दडवल्याचा आरोप सिद्ध झालाय. या तपासात जादा मालमत्तेची कागदपत्रंही सापडली . एवढंच नव्हे तर महाजन यांनी दुसर्‍याची मालमत्ताही स्वत:च्या नावावर त्यांनी दाखवल्याची माहिती पुढे आलीय. आमदार महाजन यांची सध्या शासकीय कार्यालयांत धावपळही सुरु आहे. ही सर्व मालमत्ता शेतीच्या उत्पन्नातून वाढलीय असं त्यांचं म्हणणं आहे. अपात्र ठरणारच नाही, हा त्यांना विश्वास आहे. याबाबत स्वत:ची बाजू मांडताना आमदार गिरीश महाजन म्हणाले, ' मी शेतकरी कुटुंबातील असल्यानं माझ्याकडे वडिलोपाजिर्त शेती आहे आणि चार प्लॉट होते. त्यातला एक त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर राहूनही गेला तर त्यातून असा फार आर्थिक फायदा माझा होणार होता आणि मी मतदारांना भुलवत होतो, असा कुठला अर्थ त्यातून निघत नाही आणि त्यामुळे हा मुद्दा काही फार महत्त्वाचा आहे, असं मला काही वाटत नाही. तांत्रिक चूक असू शकते. पण यामुळे काही फार मोठं विपरित झालं का एक प्लॉट बघून लोकांनी मला खूप 30 – 35 हजाराचं मताधिक्य टाकलं, असा काही प्रश्न उरत नाही '.

close