हरि भक्तीत दंग, टाळाचा नाद घुमला मृदंगाबरोबर !

June 27, 2011 6:01 PM0 commentsViews: 73

साहेबराव कोकणे, अहमदनगर 27 जून

काम तर मोठं कष्टाचं आणि जिकिरीचं. पण विठ्ठलावरची भक्ती आणि पारंपरिक व्यवसाय त्यामुळे कष्टांचंही सुख वाटू लागतं. हरिकीर्तन त्याच्याशिवाय होत नाही आणि विशेषत: वारी सुरु झाल्यावर मृदंगाबरोबर त्यांचा नाद घुमला की मन धन्य होतं.

हरिकीर्तनात मृदंगाबरोबर झंकारतात ते हे टाळ. काशांचे हे टाळ बनवण्यासाठी नगरच्या कलमदानींच्या घरी आता त्या धातूचं ओतकाम सुरू आहे. भट्टी लावली. आता वितळवलेलं कासं डांबरमिशि्रत साच्यात ओतलं जातं आहे. हे झाले कच्चे टाळ. त्यानंतर ते टिकावेत म्हणून त्यांना मिठाचं पाणी लावलं जातं. नंतर मशीनिंग करून त्यांना चमक आणली जाते. मग श्यामराव कलमदानी आपला अनुभव वापरून त्यावर नक्षीकाम करतात. त्याचवेळी या व्यवसायातल्या अडचणींची खंतही त्यांना जाणवते.

श्यामराव पाचव्या पिढीच्या हाती हा व्यवसाय सोपवत आहेत. यातली कलाकुसर त्यांना फारशी शिकवावी लागत नाही कारण ती अंगभूतच आहे. शंकरची ही सहावी पिढी व्यवसायात आहे . तो गेल्या 15 वर्षांपासून टाळ बनवतोय. पैसा कमी मिळतो पणं वारकरी संप्रदायाची सेवा केल्याचे अध्यात्मिक समाधान अनमोल असल्याचंही तो सांगतो.

काश्याचे हे टाळ हे फक्त अहमदनगरमध्येच बनतात. नगरी टाळ, पुणेरी टाळ, नेपाळी टाळ आणि झांझ असे अनेक प्रकार यात आहेत. टाळांचं हाच नाद मग आपल्याला वारीमध्ये हरिदर्शनची अनुभूती देत राहतो.

close