सुरांचा जादुगार हरपला

September 2, 2011 5:32 PM0 commentsViews: 11

02 सप्टेंबर

ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळेंचं आज निधन झालं. सूरांचा हा जादूगार आपल्यातून निघून गेला. आणि आता उरल्यायत त्या खळेकाकांच्या अजरामर गाण्यांच्या आठवणी.

गेली सहा दशकांहून अधिक मराठी संगीतातल्या भावगीतांवर गारुड करणारा संगीतकार आज काळाच्या पडद्याआड गेला. अभंग, भावगीत, बालगीत किंवा चित्रपट गीत असो. खळेकाकांच्या संगीतातील नजाकतच काही और होती. मराठी संगीतात अवीट गोडी निर्माण करणारे खळेकाका जास्त रमले ते भावगीतांमध्ये. यासोबतच त्यांनी सहा मराठी चित्रपटांनाही संगीत दिलं. शिवाय काही मोजक्या नाटकांनाही खळेकाकांच्या संगीताचा साज चढला. भावगीतामध्ये खळेकाकांच्या शुक्रतारा मंदवारा या गाण्याने तर सुवर्णमहोत्सव साजरा केला. अंतर्यामी सूराला गवसणी घालणार्‍या खळेकाकांची शिष्य परंपराही मोठी आहे.

पद्मभूषण पुरस्कारासोबतच खळेकाकांना अनेक पुरस्कार मिळाले. खरं त्यांची एवढी संगीत कारकिर्द पाहिली तर त्यांच्या म्हणावा तसा सन्मान झालाच नाही. अर्थात त्यांचं या क्षेत्रातलं कार्य पुरस्कारांच्याही पलीकडचं होतं. खळेकाकांनी बालगीतांमधूनही लहानांना आपलंसं केलं. बर्‍याच वर्षांनी नुकतंच कळी या सिनेमाला संगीतही दिलं. तो सिनेमा अजून तयार होतोय. संगीतातला हा राजहंस आपल्यातून निघून गेला असला तरी त्यांच्या अजरामर गाण्यांची सोबत मात्र कायमच आपल्याबरोबर असणार आहे.

close