कसाब पाकिस्तानी असल्याबद्दल शंका- झरदारी

December 14, 2008 4:20 PM0 commentsViews: 1

14 डिसेंबर मुंबईवर हल्ला करणारे अतिरेकी पाकिस्तानी असल्याचा पाकिस्ताननं इन्कार केलाय. पण, हल्ल्यात जिवंत सापडलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाब यानं पाकिस्तानी सरकारकडे कायदेशीर मदत मागितली आहे. कसाबनं पाकिस्तानच्या उच्च आयुक्तालयाला यासाठी एक पत्र लिहिलं. त्यात कसाबने आपला गुन्हा कबूल केला आहे. तसंच आपला साथीदार इस्माईल खान याच्यावर पाकिस्तानमध्ये सन्मानात अंत्यसंस्कार व्हावेत, अशी विनंतीही त्यानं केली आहे.दरम्यान कसाब पाकिस्तानी असल्याबद्दल आम्हाला शंका आहे असं पाकिस्तानचे अध्यक्ष, असिफ अली झरदारी यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान मुंबई हल्ल्यातले अतिरेकी आपले नसल्याचं दाखवणं आता पाकिस्तानसाठी अवघड बनलं आहे. कारण सर्व अतिरेकी पाकिस्तानीच होते, याचे ठोस पुरावे मिळत आहेत. या पुराव्यांना बळकट बनवणारा आणखी एक पुरावा म्हणजे हल्ल्यात जिवंत सापडलेला अतिरेकी अजमल कसाब यानं पाकिस्तानी उच्चायुक्ताला लिहिलेलं पत्र.पाकिस्तानी उच्चायुक्तालयाला कसाबनं 3 पानी पत्र लिहिल्याचं मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलंय. या पत्रात त्यानं मुंबई हल्ल्याची कबुली दिली आहे. त्याचबरोबर आपण पाकिस्तानी नागरिक असून लष्कर ए तोयबाच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचं सांगितलं. पाकिस्तानी अधिका-यांकडून त्यानं कायदेशीर मदतही मागितली. झकी उर रहमान लख्वी यानं आपल्याला अतिरेकी कारवायांमध्ये आणलं असं कसाबनं पत्रात म्हटलंय. तसंच लष्करचा प्रमुख हफीज सईद आणि मोहम्मद खफा यांचा प्रशिक्षक म्हणून उल्लेख केला आहे. कसाबचं हे पत्र मुंबई पोलिसांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडं सादर केलं आहे. त्याची पहिल्यांदा पडताळणी करून नंतर पाकिस्तानी उच्चायुक्तालयाकडे पाठवलं जाईल. पाकिस्तानी उच्चायुक्तालयानं आतापर्यंत असं पत्र मिळाल्याचा इन्कार केला आहे. तसंच मुंबई हल्ल्यातल्या पाकिस्तानी नागरिकांच्या सहभागाचे पुरावे मागणं सुरूच ठेवलंय. भारतानं मात्र योग्यवेळी योग्य ती माहिती देऊ अशी भूमिका घेतली आहे.काहीही असो मुंबई हल्ला आणि त्याचा पाकिस्तानशी संबंध दिवसेंदिवस दृढ होत आहेत.

close