भूपेन हजारिका यांचा जीवनप्रवास

November 5, 2011 5:04 PM0 commentsViews: 27

05 नोव्हेंबर

बनारस विद्यापीठाचे पदवीधारक…कोलंबियामधून डॉक्टरेट…आसामी विधानसभेचे आमदार…दिग्गज चित्रपटनिर्माते, कवी , संगीतकार आणि एक कली दो पत्तीयाँसारख्या खास आसामी मातीतल्या नाजूक गाण्याचे गायक….डॉ. भूपेन हजारिका नावाच्या लिजंडचा हा थक्क करणारा प्रवास..

धीरगंभीर, आर्त खोलीचे सूर आणि आसामी मातीचा सुगंध..भूपेन हजारिका या लिजंडरी व्यक्तिमत्त्वाची ही एक ओळख. गायक आणि संगीतकार म्हणूनच ते सामान्यांना माहित होते, पण ते ध्येयवादी सिनेनिर्माते, गीतकार आणि उत्तम कवीही होते. वयाच्या 12 व्या वर्षी आसामी सिनेमात त्यांनी पहिलं गाण गायलं.

त्यानंतर त्यांचा हा सूरमयी प्रवास सुरु झाला.त्यांनी त्यानंतर अनेक गाजलेल्या हिंदी आणि आसामी चित्रपटांना संगीत दिलं. कल्पना लाजमींच्या एक पलसाठी त्यांनी साऊंडट्रॅक निर्मितीचं काम केलं, त्याचबरोबर सई परांजपेच्या साज साठी आणि एम एफ हुसेनच्या गजगामिनीसाठीही त्यांनी वेगळ्या प्रकारच्या संगीताचा प्रयोग केला.

आसामीत चित्रनिर्मिती करताना भूपेन यांनी गायकाबरोबरच संगीतकार आणि दिग्दर्शक म्हणूनही आपला ठसा उमटवला. आसामी सिनेमांना राष्ट्रीय पातळीवर नाव मिळवून देण्याचं बहुमोलं कार्य त्यांनी केलं. त्यांच्या शकुंतला, प्रतिध्वनी आणि लोटी घोटी या चित्रपटांना राष्ट्रीय सन्मान मिळाले. इशान्येच्या मातीच्या या सुपुत्रानं मग अरुणाचलं प्रदेशचा पहिला हिंदी चित्रपट मेरा धरम मेरी माच्या संगीताबरोबरच दिग्दर्शनही केलं होतं.मास कम्युनिकेशनमध्ये अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवलेल्या या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाने मग 60 च्या दशकात आसामच्या विधानसभेतही आमदार म्हणून निवडून येण्याची किमया साधली. त्यांच्याच प्रयत्नामुळे नंतर आसाम सरकारचा गुवाहाटीमध्ये स्वत:चा स्टुडिओ उभा राहिला..पद्मभूषण आणि संगीत नाटक अकादमीच्या सन्माजजनक पुरस्कारांसोबतच देशभरात अभिमानाचा दादासाहेब फाळके पुरस्कारही त्यांना मिळाला होता. अंतरीचं गूढ उलगडून दाखवणार्‍या साधुपुरुषासारख्या धीरगंभीर आवाजाचे भूपेन हजारिका आपल्या कायमच्या आठवणीत राहणारे आहेत.

close