विधानसभेचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू

December 15, 2008 5:12 AM0 commentsViews: 23

15 डिसेंबर, नागपूरहिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून नागपूरमध्ये सुरुवात होत आहे. मुंबईवर झालेला अतिरेक्यांचा हल्ला, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न, शेतकर्‍यांच्या आत्महत्या आणि नारायण राणे यांच्या बंडामुळे हे अधिवेशन नवे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी कसोटीचे ठरणार आहे. मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यातुन अजून राज्य सावरलेलं नाही. त्यामुळे विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. नवे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना विरोधी पक्षांबरोबरच नाराज झालेले नारायण राणे यांच्या प्रहाराचाही सामना करावा लागणार आहे. दरम्यान आपल्या वेगवेगळ्या मागण्यासांठी 18 संघटना आज नागपूर विधानभवनावर मोर्चा आणणार आहेत. त्यात महत्त्वाच्या म्हणजे शिक्षकेतर संघटना आपल्या मागण्यांसाठी, राष्ट्रपतींचे पती देवीसिंग शेखावत यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा आणणार आहेत. त्याचबरोबर मानवाधिकार संघटना, बीएएमस विद्यार्थ्यांची संघटना यांचेही मोर्चे आहेत. मात्र पोलिसांनी अधिवेशनादरम्यान फक्त 54 संघटनांना मोर्चाची परवानगी दिली आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं विधानभवन आणि परिसरात खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तसंच सरकारी आणि निमसरकारी कर्मचार्‍यांना ओळखपत्रं सक्तीची करण्यात आली आहेत.

close