राष्ट्रवादीचे कार्यकर्ते – अण्णा समर्थक आमनेसामने

November 25, 2011 8:13 AM0 commentsViews: 2

25 नोव्हेंबर

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांवरील हल्ल्यानंतर अण्णांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज राळेगणमध्ये जावून आत्मक्लेश आंदोलन करण्यासाठी कार्यकर्ते राळेगणमध्ये दाखल झाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राळेगणमध्ये शांततेनं आत्मक्लेश आंदोलन करु द्यावे अशी मागणी केली होती.

पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि राळेगणचे ग्रामस्थ यांच्यात वाद झाला. यावेळी अण्णांनी ग्रामस्थांसोबत चर्चा करून त्यांना अहिंसेच्याच मार्गाने आंदोलन करणार्‍यांना थांबवू नका असं अण्णा हजारे यांनी म्हटलं. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र आक्रमक होते. त्यांनी राळेगणमध्ये अण्णांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि अण्णांचा पुतळा जाळला.

त्यामुळे राळेगणवासीय आक्रमक झाले. त्यांनी राष्ट्रवादीच्या कायकर्त्यांना राळेगणमधून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी राष्ट्रवादीच्या गाडीवर राळेगणवासीयांनी थपडा मारल्या. काही गाड्यांच्या काचाही फोडल्या. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सध्या राळेगणमधून निघून गेले आहे. राळेगणमध्ये जाणार्‍या सगळ्या मार्गांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली.. मार्ग बंद करण्यात आले आहे.

शरद पवारांवर माथेफिरुचा हल्ला…आणि त्यावर अण्णांचं वादग्रस्त वक्तव्य…गुरुवारी घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद शुक्रवारीही उमटले. संतापलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट राळेगणसिद्धीकडेच धाव घेतली. आणि अण्णांविरोधात जोरदार निदर्शनं केली. आत्मक्लेश आंदोलन करण्याचा त्यांचा इरादा होता.पण राळेगणवासीही आक्रमक झाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना राळेगणमधून हुसकावून लावलं.

कार्यकर्त्यांच्या वाहनांवर थपडा मारल्या…त्यामुळे राळेगणमध्ये तणाव निर्माण झाला. यानंतर राळेगणमध्ये आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पारनेरमध्ये आत्मक्लेश आंदोलन केलं.आणि संताप व्यक्त केला. अण्णांच्या विरोधातला हे आंदोलन राज्यातल्या इतर भागातही पोचलं. कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अण्णांचा पुतळा जाळला. आणि जोरदार निदर्शनं केली.

दरम्यान या आंदोलनाच्या वातावरणातच शरद पवार संध्याकाळी मुंबईत दाखल झाले. हजारो कार्यकर्त्यांनी त्यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं. यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी चर्चा केली मात्र अण्णांवर बोलण्यास टाळलं.

close