इंदू मिलवर रिपाई कार्यकर्त्यांचा हल्लाबोल ; जाळपोळ, तोडफोड

December 15, 2011 4:27 PM0 commentsViews: 8

15 डिसेंबर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची संपूर्ण जागा देण्यात यावी यामागणीसाठी गेल्या 9 दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. रिपाईचे नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली चैत्यभूमी ते इंदू मिल निघालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. रिपाईचे हजारो कार्यकर्त्यांनी मिलमध्ये घुसले आणि मिलमध्ये जाळपोळ केली आहे. तसेच मिलची तोडफोड केली आहे. जर सरकारने लवकर निर्णय घेतला नाही तर या पुढे होणार्‍या घटनांना सरकार जबाबदार असेल असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे. तसेच यापुढील आंदोलन तीव्र करण्यात येईल असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

बुधवारी मुंबईतल्या इंदू मिलची संपूर्ण जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी संपूर्ण 12 एकर जागा देणं शक्य नसल्याचे केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री पी. लक्ष्मी यांनी राज्यसभेत सांगितलं. फक्त 4 एकर जागा देण्यावर विचार होऊ शकतो, असं लक्ष्मी यांनी म्हटलं आहे.केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेबद्दल आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले आहेत. आज सकाळी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरच्या प्रियदर्शिनी परिसरात 25 ते 30 मिनिटं रास्ता रोको करुन सरकारच्या निर्णर्याचा निषेध त्यांनी केला.यावेळी टायर जाळून वाहतुकीची कोंडी करण्याचाही आंदोलकांनी प्रयत्न केला. आरपीआय नेते रामदास आठवलेंसह हजारो कार्यकर्त्यांनी चैत्यभूमी ते इंदू मिल असा धडक मोर्चा काढला. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागले. कार्यकर्त्यांनी मिलचे गेट तोडून आत प्रवेश केला. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी मिलच्या परिसरात तोडफोड केली तसेच परिसरात जाळपोळ केली. यावेळी तैनात असलेल्या पोलिसांकडून वारंवार सुचना देण्यात येत असतानाही कार्यकर्त्यांनी धुडकावत लावत तोडफोड सुरुच ठेवली. तब्बल अर्धा तास ही तोडफोड सुरु होती. यावेळी आठवले यांनी मिलमध्ये एक सभा घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. तसेच सरकारने स्मारकासाठी जागा दिली नाही तर यापुढे होणार्‍या घटनांना सरकार जबाबदार असेल असा इशारा दिला त्याचबरोबर यापुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असंही आठवलेंनी स्पष्ट केलं.

close