नाटक जगलेला माणूस…

December 25, 2011 5:26 PM0 commentsViews: 50

25 डिसेंबर

सत्यदेव दुबे यांना तन्वीर पुरस्काराने सन्मानित करून फार दिवस झाले नव्हते. आणि आता त्यांच्या निधनाची बातमी आली. ते आजारी होते, तरी या बातमीवर विश्वास ठेवणं अनेकांना जड जातंय. रंगभूमीवरचे ते आधारस्तंभ.. अनेक दिग्गज कलावंत, नाटककार, दिग्दर्शक यांना त्यांनी घडवलं आहे. दुबेजी स्वत: भाषेच्या पलीकडे होते. त्यामुळे नाटक मराठी असो, वा हिंदी… त्यांचा पगडा अनेक प्रायोगिक नाटकापासून व्यावसायिक नाटकांपर्यंत सगळ्यावर दिसत असे. आधे अधुरे, अंधा युग, तुघलक ही त्यांची गाजलेली नाटकं. तेंडुलकरांची आणि पुल देशपांडे यांची अनेक नाटकं त्यांनी हिंदीत आणली. त्यात महत्त्वाची म्हणजे सखाराम बाइंडर, बेबी ही होती. अंकुर, मंडी, भूमिका अशा ऑफबिट सिनेमांचे संवाद त्यांचेच.. दुबेजींनी आपल्या शैलीत कलाकारांना शहाणं करून सोडलंच. पण प्रेक्षकांनाही ते नाटक कसं पाहायचं ते सांगायचे, 'Surrender yourself to the play' नाटक आवडलं नाही तरी त्यातला एखादा क्षण बरचं काही शिकवून जाईल, ही त्यांची शिकवण…राष्ट्रीय पुरस्कार, फिल्म फेअर पुरस्कार, पद्मभूषण आणि आताचा तन्वीर असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले असले तरी त्यांच्यावर प्रेम करणार्‍या माणसांच्या संख्येपुढे हे पुरस्कार फार किरकोळच वाटतील.तीन वर्षांपूर्वी त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या नाटकांचा महोत्सव पृथ्वी थिएटरमध्ये केला होता. त्यावेळी सगळ्यांशी दिलखुलासपणे बोलणारे दुबेजी इतक्या लवकर एक्झिट घेतील, असं वाटलं नव्हतं. त्यांना आयबीएन लोकमतची आदरांजली…

close