गोंदियातलं सरकारी तांदूळ खरेदी केंद्र बंद

December 16, 2008 7:17 AM0 commentsViews: 56

16 डिसेंबर, गोंदियागोपाल मोटघरेमहाराष्ट्रातील सगळ्यात जास्त तांदूळ पिकतो विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात. तांदूळ म्हणजेच धान. पंधरा नोव्हेंबर पासून शेतकरी आपले पीक घेऊन बाजारात येऊ लागले आहेत पण इथं सरकारी खरेदी सुरु झालेली नाही. धान विक्रीसाठी सरकारी किंमत जाहीर झालीय 930 रुपये प्रति क्विंटल. पण शेतकर्‍यांना नाईलाजाने साडेआठशे रुपये प्रति क्विंटल दरानं व्यापार्‍यांना तांदूळ विकावा लागतोय. सरकारनं उशिरा खरेदी केंद्र सुरु केल्यामुळं फायदा व्यापार्‍यांचा होईल. व्यापारी साडे आठशे रुपये क्विंटल भावानं शेतकर्‍यांकडून धान खरेदी करत आहेत. शेतकर्‍यांकडं साठवणूकीची सोय नाही. त्यामुळे जेव्हा सरकारी खरेदी केंद्र सुरु होतील तेव्हा व्यापारी 850 रुपये खरेदीनं घेतलेलं धान सरकारला विकतील 930 रुपये क्विंटल भावानं. त्यांना नफा मिळेल क्विंटलमागं 80 रुपये. गोंदिया जिल्ह्यात यंदा 41 लाख 86 हजार क्विंटल धान पिकेल असा सरकारी अंदाज आहे. त्यामुळं शेतकर्‍यांना एकून तोटा आणि व्यापार्‍यंना 33 कोटीं 48 लाखांचा फायदा सरकारी तिजोरीतून होण्याची शक्यता आहे. विदर्भात शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा प्रश्न चांगलाच गाजला. यावरून भरपूर टीका झाल्यानंतर सरकारनं विदर्भातील शेतकर्‍यांसाठी मोठी पॅकेजेस जाहीर केली. गाजावाजा करत मोठ मोठ्या योजनाही जाहीर केल्या आणि स्वत:ची पाठ थोपटून घेतली. पण शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेल्या योजना कागदावरच राहिल्यात आणि शेतकरी मात्र आजही भरडला जातोय, हेच यानिमित्तानं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.

close