विरोधी नेत्यांचं सरकारी अधिकार्‍यांवर टीकास्त्र

December 17, 2008 6:29 AM0 commentsViews: 7

16 17 डिसेंबर, नागपूरआशिष जाधवमुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याला राज्याचे गृहसचिव, पोलीस महासंचालक अनामी रॉय आणि मुंबई पोलीस आयुक्त हसन गफूर जबाबदार असल्याची टीका विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी केली आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात रामदास कदम यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात पकडलेल्या अजमल कसाब याला गेट वे ऑफ इंडियावर जाहीर फाशी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. रॉ आणि आयबीनं या हल्ल्याची पूर्वसूचना देऊनही खबरदारी न घेतल्याबद्दल विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. बंदरविकास मंत्री अनिस अहमद यांनी इतर राज्यातल्या बोटींना मुंबईत यायची सरसकट परवानगी देऊन सागरी सुरक्षितता धोक्यात आणली आसा आरोपही त्यांनी केला. सीएसटी स्टेशनवर एवढा मोठा दहशतवादी हल्ला होऊनही राज्याला भेट न दिल्याबद्दल राज्य सरकारनं लालूप्रसाद यादव यांना जाब विचारावा, अशी मागणीही रामदास कदम यांनी केली. तर भाजप नेते नितीन गडकरी यांनी पोलीस महासंचालक अनामी रॉय यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याची आयबीकडून पूर्वसूचना मिळूनही राज्य सरकार गाफील राहिलं. पोलीस महासंचालक अनामी रॉय यांनी निष्काळजीपणा दाखवला. त्यामुळे रॉय यांना बडतर्फ करावं, अशी मागणी भाजप नेते नितीन गडकरी यांनी विधानपरिषदेत केली तसंच सरकार दहशतवाद्यांचं लांगूलचालन करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. गोपीनाथ मुंडे यांनी राज्यपाल एस. सी. जमीर यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. मुंबईत दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी राज्यपाल दिल्लीत होते. आणि राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असावा याबाबत सोनिया गांधीशी चर्चा करत होते, असा आरोप मुंडे यांनी केला. विरोधकांच्या या टीकेला बुधवारी सत्ताधारी पक्षाकडून उत्तर दिलं जाणार आहे. गृहमंत्री जयंत पाटील सत्ताधारी पक्षाची बाजू सभागृहात मांडणार आहेत. 26/11 नंतर राजकारण्यांविषयी जनतेच्या मनात संताप आहेच. त्यातच विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांचा सामना करत राज्य सरकार आपली बाजू कोणत्या पद्धतीने मांडणार, याविषयी उत्सुकता आहे.

close