पाट्या कोपर्‍यात, बच्चे कंपनी बोंबलतेय प्रचारात !

February 10, 2012 1:54 PM0 commentsViews: 4

गोपाल मोटघरे, पुणे

10 फेब्रुवारी

प्रचारामध्ये गर्दी दिसावी म्हणून पेड कँपेनर्सही आयात केले जात आहे. पण या रणधुमाळीत मोठ्या कार्यकर्त्यांबरोबर लहान मुलंही प्रचारात सहभागी झाली आहेत. त्यात या शाळकरी मुलांचे मोठं शैक्षणिक नुकसान होतं आहे याची जराशीही जाणीव या सूज्ञ राजकीय पक्षांना नाही.

'जॉनी जॉनी यस पप्पा…' नर्सरीतली गाणी म्हणण्याचं या चिमुकल्याचं वय….पण तो आईबरोबर राजकीय पक्षाच्या प्रचारात आला आहे. राजकीय पक्षांचे झेंडे आणि बॅनर घेऊन फिरणार्‍या या मुलांना आपण कोणाचा प्रचार करतोय हेही माहीत नाही. लहान मुलांचा प्रचारात वापर केल्यामुळे या शाळकरी मुलांचं शोषण होतं आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला.

एरवी निवडणूक आयोग निवडणुकीच्या प्रत्येक कार्यक्रमांसाठी आचारसंहिता लागू करतो. पण प्रचारासाठी शाळकरी मुलांच्या वापराबद्दल कोणी एका शब्दानेही आक्षेप घेताना दिसत नाही. राजकीय पक्ष मुलंाच्या शैक्षणिक विकासाबद्दल आश्‍वासनांवर आश्वासनं देतात. मात्र ते आपल्या प्रचार कार्यक्रमात मुलांबद्दल बेजबाबदारपणाने वागताना दिसत आहे.

close