द ऑस्कर गोज टू ‘द आर्टिस्ट’

February 27, 2012 5:39 PM0 commentsViews: 13

27 फेब्रुवारी

यंदाच्या ऑस्करमध्ये द आर्टिस्टनं बाजी मारली. सर्वोत्कृष्ट चित्रपट,दिग्दर्शक आणि अभिनेत्याचा पुरस्कार द आर्टिस्टनं पटकावला. तर ह्युगो लाही 5 पुरस्कार मिळाले. तसेच इराणी चित्रपट द सेपरेशन ठरलाय सर्वोत्कृष्ट परदेशी सिनेमा..

सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि जाँ ड्युजारदँला मिळालेल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या सन्मानासह तब्बल पाच अवॉर्डस जिंकून द आर्टिस्ट या सिनेमानं यावर्षीच्या ऑस्कर सोहळ्यात बाजी मारली. आर्टिस्टला तगडं आव्हान दिलं ते मार्टिन सॉर्सिसच्या ह्युगो या सिनेमानं…या सिनेमालाही सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, व्हिज्युअल इफेक्टससह पाच ऑस्कर मिळालेत. ह्युगोला मिळालेले हे सर्व सन्मान तांत्रिक विभागातील आहेत हे विशेष. द आर्टिस्ट आणि ह्युगो हे दोन्ही सिनेमे खरंतर वेगवेगळ्या काळाचं प्रतिनिधीत्व करतात. वीसच्या दशकातल्या मूकपटांचा काळ द आर्टिस्ट सिनेमातनं पुनरुज्जीवित होतो तर आजच्या थ्रीडी सिनेमांच्या ट्रेंडमधलं उत्तम उदाहरण म्हणजे ह्युगो हा सिनेमा.सतरा वेळा ऑस्करसाठी नामांकीत झालेली अभिनेत्री मेरिल स्ट्रीप यावर्षी तिसर्‍यांदा हा सन्मान जिंकली. द आयर्न लेडी या सिनेमातल्या ब्रिटनच्या पहिल्या महिला आणि सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहीलेल्या मार्गरेट थॅचरच्या भूमिकेसाठी त्यांना हा सन्मान मिळाला. याबरोबरच याच भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट मेकअपचा ऑस्करही दिला गेला.

ऑस्करच्या शर्यतीत सुरुवातीला अग्रभागी असणारा जॉर्ज क्लूनीचा द डिसेन्डन्टस हा सिनेमा प्रत्यक्षात केवळ एकच अवॉर्ड जिंकू शकला.आणि तो ही अडाप्टेड पटकथा विभागासाठी. सर्वोत्कृष्ट पटकथेचा ऑस्कर दिला गेला तो मिडनाईट इन पॅरिस या सिनेमाला..सिनेमाचे लेखक दिग्दर्शक वुडी ऍलन मात्र यावेळी गैरहजर होते. यावर्षी सर्वोत्कृष्ट सहकलाकारासाठी मिळालेले दोन्ही ऍवार्ड त्या कलाकारांचे पहिले ऑस्कर होते. यात द हेल्प सिनेमासाठी ऑक्टेविया स्पेन्सर हिला तर बिगिनर्स या सिनेमासाठी 82 वर्षांच्या ख्रिस्तोफर प्लमर यांना ऑस्कर मिळाला. सत्य आणि अगतिकतेचं अत्यंत ह्रदय असं चित्रण दाखवणार्‍या अ सेपरेशन या इराणी सिनेमाला सर्वोत्कृष्ट फॉरेन फिल्मचा सन्मान मिळाला. असगर फरहादी दिग्दर्शित हा सिनेमा समीक्षकांच्या पसंतीतही वरचढ ठरला. तर ऍनिमेशन फिचर या विभागात बाजी मारली ती रॅन्गो या सिनेमानं. जॉनी डेपच्या आवाजात पडद्यावर दिसणार्‍या या हिरव्या शॅमेलिअन सर्वोत्कृष्ट ऍनिमेशन फिचरचा ऑस्कर पटकावला.

close