‘मंकी मॅन’ निव्वळ अफवा !

March 1, 2012 5:26 PM0 commentsViews: 17

अजित मांढरे, मुंबई

01 मार्च

मुंबईत सध्या मंकी मॅनच्या अफवेमुळे घबराट पसरली आहे. या अफवेमुळं कांदिवली परिसरात एका तरुणाचा बळी गेला. ही निव्वळ अफवा आहे हे पोलीसांनी अनेकदा सांगून देखील नागरिकांमध्ये मात्र या अफवेनं भिती पसरवली आहे.दिल्ली-6 सिनेमातील मंकी मॅन सगळ्यांनाच आठवत असेल. अशा भंपक गोष्टी फक्त सिनेमातच असतात, असं तुम्हाला वाटत असेल. पण आता या अफवांना.. अनेक मुंबईकरही बळी पडलेत. एक मोठी, काळी आकृती मुलांना पळवते, हल्ला करते.. अशा अफवा पसरल्याने.. मुंबईच्या अनेक भागात रात्रीच्या वेळी लोक गस्त घालत आहे ही गस्त घालतानाच.. कांदिवलीत एक तरूण पाय घसरल्याने मृत्युमुखी पडला. आधी या अफवा मुंबईत भांडुप, मुलुंड, घाटकोपर या पूर्व उपनगरात होत्या. नंतर या अफवा वणव्यासारख्या कांदिवली,मालाड, मालवणी, मरोळ, या पश्चिमेकडच्या उपनगरांतही पसरल्या.

मंकी मॅनला पकडण्याच्या नावाखाली हे अतिउत्साही तरूण अनेकदा निष्पाप माणसांना मारण्याच्या घटनाही घडतायत. मुंबईत नोकरी शोधण्यासाठी आलेल्या अशाच एका माणसाला.. मुलुंड-भांडुप परिसरात बेदम मारहाण करण्यात आली. मंकी मॅन अस्तित्वात नाहीये, असं आवाहन पोलीस वारंवार केलंय.

प्रत्यक्षात मंकी मॅनने कोणावरही हल्ला केल्याचे किंवा चोरी केल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. अफवांवर विश्वास ठेवू नका,असं पोलीस सांगत असले. तरी नागरिकांनी रात्रीची गस्त सुरू ठेवली आहे. त्यामुळे अशा अफवा पसरवणार्‍यांवर पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे. घाटकोपरमध्ये 30 जणांवर अफवा पसरवल्याचा गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मंकी मॅनच्या अफवेवर जनतेनं विश्वास ठेवू नये, असं आवाहन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केलं आहे.

close