राहुल द्रविडची निवृत्तीची घोषणा

March 9, 2012 12:30 PM0 commentsViews: 9

09 मार्च

भारताचा 'द वॉल' राहुल द्रविडनं क्रिकेटला अलविदा केला आहे. आज बंगळुरुमध्ये पत्रकार परिषदेत राहुल द्रविडने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. याआधीच त्यानं वन डे आणि टी-20 क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात राहुल द्रविडची कामगिरी चांगली झाली नव्हती. भारतीय टीमला तर व्हाईटवॉश मिळालाच. शिवाय द्रविडने स्वत: 8 इनिंगमध्ये 194 रन्स केलेत. त्याचा ऍव्हरेज 24 रन्सचा होता. शिवाय सीरिजमध्ये द्रविड रेकॉर्ड सहावेळा क्लीनबोल्ड झाला. त्याच्या आणि एकूणच सीनिअर खेळाडूंच्या कामगिरीवर सगळीकडून टीकेची झोड उठली होती. पण ऑस्ट्रेलियाचा दौरा वगळता द्रविड भारतीय टीमचा प्रमुख आधारस्तंभ राहिला. टेस्ट करिअरच्या 15 वर्षात द्रविडनं देशात आणि परदेशात भारताला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिलेत. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करणार्‍या बॅट्समनच्या यादीत सचिननंतर द्रविड हा दुसर्‍या क्रमांकावरचा बॅट्समन आहे. वन डे क्रिकेटमध्येही त्याच्या नावावर 10 हजाराहून अधिक रन्स आहेत. याशिवाय टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक 210 कॅचचा वर्ल्ड रेकॉर्डही त्याच्याच नावावर आहे. सचिन तेंडुलकर, व्ही व्ही एस लक्ष्मण आणि राहुल द्रविड या भारताच्या त्रिमुर्तीमधून द्रविड आता निवृत्त झाला आहे.

close