तरुणांची कमाल, गावातच केली वीजनिर्मिती !

March 10, 2012 5:54 PM0 commentsViews: 63

चंद्रकांत बनकर, रत्नागिरी

10 मार्च

रत्नागिरीच्या सोनगावमध्ये 'स्वदेस'ची कथा घडली आहे. गावातल्याच तरुणांनी पुढाकार घेत गावात वीजनिर्मिती केली. लोडशेडिंगमुळे अंधारात असलेलं सोनगाव आता उजळून निघालं आहे.

नासातली नोकरी सोडून गाव उजळण्यासाठी धडपडणार्‍या तरुणाचा 'स्वदेस' हा चित्रपट आपल्याला आठवत असेल. अगदी तशीच कहानी रत्नागिरी जिल्ह्यातली सोनगावमध्ये घडली. गावातल्याच एका दरीत कोसळणार्‍या ओढ्याच्या पाण्यावर दोन हजार वॅट वीज तयार करण्याची किमया सोनगावच्या तरुणांनी केली. त्यावर 40 पथदिवे या तरुणांनी लावले त्याचबरोबर एका प्राथमिक शाळेलासुद्धा वीजपुरवठा केला.

स्थानिक नागरीक राजेंद्र घाग म्हणतात, 16 -16 तास भारनियमन..काळोखाचं साम्राज्य..शाळेला पण वीज दिली. विद्यार्थ्यांना त्रास व्ह्यायचा ' अगदी स्वदेसप्रमाणंच सोनगावची ही कथा पुढे सरकते. स्वदेसमधल्या मोहन भार्गवसारखं सोनगावात स्थानिक इलेक्ट्रिशियन संजय कदम आणि उदय पोटेंनी ओढ्याच्या पाण्यावर चालणारं टर्बाईन तयार केलं. यासाठी गावानंच दीड लाखांचा निधी जमवला.

संजय कदम म्हणतात, आम्ही कोयनेच्या चौथ्या टप्प्याची पाहणी केली. त्याच पध्दतीने वीज निर्मिती केली. जास्त आरपीएम असणारे टर्बाईन तयार केले. गावातल्या तरुणांनी सहकार्य त्यांच्यामुळे हे सर्व शक्य होऊ शकलं. सोनगावमधल्या नवयुग मित्रमंडळाच्या पुढाकाराने हा चमत्कार घडला. आणि 16 -16 तास अंधारात असलेलं सोनगाव उजळून गेलं.

close