शिवसेनेची खरी वृत्ती समोर आली – राज

March 15, 2012 12:45 PM0 commentsViews: 2

15 मार्च

नागपूरमध्ये भाजपची सत्ता आली पण सत्तेवर येण्यासाठी युती असून शिवसेना बाहेर राहिली आणि भाजपाला मुस्लिम लीगने पाठिंबा दिला आणि नाशकात भाजपने मनसेला पाठिंबा दिला तर इतका थयथयाट कशाला ? शिवसेनेच्या मनात माझ्या आणि पक्षाबद्दल काय आहे हे तमाम मराठी जनतेसमोर आलं आहे त्यांचा खरा चेहरा लोकांनी पाहिला आहे. अशी प्रतिक्रीया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. आज नाशिकमध्ये मनसेचा महापौर झाला त्यानंतर पत्रकारांशी राज यांनी संवाद साधला.अखेर नाशिक महापालिकेवर मनसेचा झेंडा फडकला. अलीकडेच मनसेचा सहावा वर्धापनदिन साजरा झाला. गेल्या सहावर्षात मनसेची घोडदौड पाहता नाशिकमध्ये पहिला महापौर हा यतीन वाघ यांच्या रुपाने झाला. महापालिकेच्या निवडणुकीत मनसेनं सर्वाधिक 40 जागा जिंकत महापौरपदाचा दावा केला. आणि राज यांनी नाशिककरांना दिलेला शब्द खरा केला. भाजपने व्हिप जाहीर करुन मनसेला आपला पाठिंबा दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तटस्थ राहिले. पण भाजपने मनसेला दिलेल्या पाठिंब्यामुळे शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली. भाजपने आपल्याला धोका दिला अशी कडवट प्रतिक्रीया शिवसेनेच्या शिलेदारांनी दिली. या प्रतिक्रीयेचा समाचार घेत राज ठाकरे यांनी शिवसेनेला टोला लगावला. तिकडे नागपूरमध्ये भाजपची सत्ता आली पण शिवसेनेनं पाठिंबा देण्याऐवजी बाहेर राहिली. भाजपला मुस्लिम लीगने पाठिंबा दिला. नेहमी हिंदूत्वावर बोलणारी शिवसेना यावेळी गप्प का बसली. यावर काही थयथयाट केला नाही. आणि इकडे भाजपने मनसेला पाठिंबा दिला त्यावर इतका थयथयाट कशाला करायचा. मुळातच शिवसेनेच्या मनात काय आहे हे तमाम मराठीजणांनी पाहिले आहे यांच्या मनात माझ्याविषयी आणि मनसेविषयी काय आहे हे उघड झालं आहे असं मत राज यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर राज यांनी तमाम नाशिककरांचे आभार मानले. नाशिकरांनी जो मनसेवर विश्वास दाखवला आहे त्याला कधी तडा जाऊ देणार नाही. नाशिक हे आधुनिक शहर करु असं आश्वासन ही राज यांनी यावेळी दिले.

close