विराट कोहली म्हणजे विजयाचं रसायन !

March 19, 2012 3:21 PM0 commentsViews: 131

अर्णब सेन, मुंबई

19 मार्च

विराट कोहली आणि भारतीय टीमचा विजय हे आता एक समीकरणच बनलंय. त्याच्या 11 सेंच्युरीपैकी 8 सेंच्युरी या टार्गेट चेस करताना झाल्यात आणि त्यामुळेच पाकिस्तान विरुध्दची कोहलीची ही विराट इनिंग क्रिकेटप्रेमींच्या कायम लक्षात राहणार आहे.

विराट कोहली नावाचं वादळ… तो मैदानावर आला तेव्हा भारताने खातंसुद्धा उघडलं नव्हतं. आणि तो आऊट झाला तेव्हा भारताला विजयासाठी हवे होते फक्त 12 रन्स… त्यानं केलेल्या दमदार 183 रन्सच्या इनिंगमध्ये तब्बल 22 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. गेल्या चार मॅचमध्ये विराटने तीन सेंच्युरी केल्यात आणि भारतासाठी त्या निर्णायक ठरल्या आहेत.

23 वर्षाच्या या गुणवाण खेळाडूची बॅटिंग आक्रमक नसली तरी मॅच विनिंग मात्र नक्कीच आहे. दोन आठवड्यापूर्वी होबार्टमध्ये श्रीलंकेविरुध्द भारताला 40 ओव्हर्समध्ये 320 रन्स करायचे होते. कोहलीच्या खेळीनं ते आव्हानही भारतानं सहज पार केलं. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध तर कोहलीनं अशीच आणखी एक लाजवाब खेळी केली.

कोहलीने सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मासोबत केलेली पार्टनरशिप महत्वाची ठरली. पण भारताची बॉलिंगची समस्या मात्र अजूनही कायम आहे. भारतीय बॉलर्सच्या सुमार बॉलिंगचा पाकिस्तानी बॅट्समननं चांगलाच समाचार घेतला.

भारताचा फायनलचा मार्ग अजूनही दूर आहे. मंगळवारी होणार्‍या श्रीलंका- बांगलादेशदरम्यान होणार्‍या मॅचमध्ये बांगलादेशची टीम विजयी ठरली, तर भारताला मायेदशात परतावं लागणार आहे.

close