तमाशा पंढरीत कोट्यावधींची उलाढाल

March 23, 2012 1:17 PM0 commentsViews: 104

रायचंद शिंदे, नारायणगाव

23 मार्च

गुढीपाडव्यानंतर महाराष्ट्रातल्या गावागावात ग्रामदेवतांच्या यात्रा-जत्रांचा हंगाम सुरु होतो. आणि यात्रा म्हटली की करमणुकीसाठी तमाशा हा आलाच. हा तमाशा ठरवण्यासाठी पुढारी मंडळी पुणे जिल्ह्यातल्या नारायणगावात गर्दी करु लागली आहेत. पाडव्याच्या मुहुर्तावर कोट्यावधीची उलाढाल तमाश्याच्या या पंढरीत होत आहे.

ढोलकीची थाप आणि घुंगुरांचा ताल… कित्येक वर्ष तमाशाची परंपरा मराठी मातीत रुजली आहे. तमाशाचा हा खेळ तुमच्या गावच्या जत्रेत आणायचा म्हटल्यावर मुक्काम पोस्ट नारायणगावाला यावच लागतं. पाडव्याच्या मुहुर्तावर इथे 35 फडमालकांनी आपली ऑफिसेस थाटली आहे.

नारायणगावात तमाशा फडमालकांच्या ऑफिसमध्ये गर्दी दिसेत ती तमाशाचा खेळ बुक करण्यासाठी. खेळ बुक करण्याला सुपारी देणं असं तमाशाच्या भाषेत म्हटलं जातं. ही तमाशाची सुपारी 40 हजारांपासून दीड लाखापर्यंत असते. मात्र महागाईचा फटका तमाशा पंढरीत दिसून येत नाही.

बदलत्या काळात करमणुकीची कितीही साधनं आली तरी गावच्या जत्रेतीलं तमाशाचं महत्व आजही कमी झालेलं नाही. त्यामुळे पाडव्याचा मुहुर्त साधून नारायणगावात येणारी गर्दी दिवसेंदिवस वाढतच जाणारी आहे.

close