पुण्यात खर्‍या ‘सिंघम’कडून ‘अबतक 26′ !

March 25, 2012 4:38 PM0 commentsViews: 47

प्राची कुलकर्णी, पुणे

25 मार्च

कोणत्याही पोलिसाला आदर्श वाटावी अशी कामगिरी केलीय पुण्यातल्या महेश निंबाळकर यांनी. फक्त दीड महिन्याच्या कालावधीत त्यांनी एक नाही दोन नाही तर तब्बल सव्वीस फरारी आरोपींना जेरबंद केलंय. याची दखल घेत त्यांना पोलीस खात्यातर्फे त्यांना एक लाख रुपये देऊन खास गौरव करण्यात आला.

सिंघम सिनेमातल्या अजय देवगणचं हे रुप संगळयांनाच भावलं. असा सिंघम प्रत्यक्षातही दिसावा अशी इच्छा सर्वसामन्यांना झाली. आणि चक्क पुणेकरांना असा सिंघम भेटला..महेश निंबाळकर यांच्या रुपाने. दीड महिन्यापुर्वी वाहनचोरीच्या प्रकरणातला आरोपी गोविंद मारवाडीला निंबाळकरांनी पकडलं. या आरोपीला पकडल्यावर पुढे निंबाळकरांच्या हाती फरारी आरोपींची एक यादीच लागली. आणि सुरु झालं सत्र आरोपींना पकडण्याचं. एक नाही दोन नाही तर तब्बल सव्वीस आरोपी गेल्या दीड महिन्यामध्ये पुणे पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.

1990 साली पोलीस दलामध्ये भरती झालेले महेश निंबाळकर हे सध्या डेक्कन पोलीस स्टेशनच्या तपास विभागात पोलीस नाईक म्हणून काम करत आहे. काम करतानाच त्यांनी मोठा जनसंपर्क निर्माण केला. आणि याचाच उपयोग त्यांना आरोपींना पकडण्यासाठी होतो. त्यांचे सहकारी आणि वरिष्ठही याबाबत त्यांचं कौतुक करतात.

आता पुढच्या दीड महिन्यामध्ये हा आकडा पन्नासपर्यंत पोहोचवण्याची निंबाळकरांची इच्छा आहे. वेगवेगळ्या प्रकरणांमधल्या आरोपींचा काहीही झालं तरी छडा लावणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

close