पाटी फुटली,शाळा तुटकी !

March 29, 2012 2:26 PM0 commentsViews: 9

प्राची कुलकर्णी,पुणे

29 मार्च

ना शाळेत बसायला बाक ना विद्यार्थ्यांना गणवेष.. हे वास्तव आहे पुण्यातल्या समाजकल्याण विभागाच्या शाळेचं. सफाई कामगारांच्या मुलांसाठी ही शाळा तर सुरु झाली. पण गेल्या अनेक वर्षांमध्ये गरजे इतके शिक्षकही मिळण्याचं भाग्य या विद्यार्थ्यांना मिळालेलं नाही.

या वर्गामध्ये बसलेले हे विद्यार्थी आहेत इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरीचे.. एकाच वर्गामध्ये एकच शिक्षिका त्यांना शिकवत आहे. कारण पहिली ते सातवी साठी इयत्तेपर्यंतच्या या शाळेत एकूण चारच शिक्षकांची नेमणूक झाली आहे. जास्त वेळ शाळा घेत आलटून पालटून विद्यार्थ्यांकडे लक्ष देत शिक्षक मुलांचा अभ्यास पूर्ण करुन घेत आहेत. जिथे शिक्षकांचीच कमतरता तिथे इतर कोणत्या गोष्टींची अपेक्षा असणार.. परिस्थिती अशी की बेंच ही संकल्पनाच त्यांना माहित नाही.

विद्यार्थी म्हणतो, आम्हाला गेल्या वर्षभरात नवे गणवेष मिळाले नाहीत. त्यामुळे आम्ही जुनेच गणवेष वापरतो. तर पहिल्या वर्गात शिकणार विद्यार्थी म्हणतो, मी पहिलीत आहे आणि माझ्या शेजारी बसलेला दुसरीत आम्ही एका वर्गात बसतो.

सफाई कर्मचार्‍यांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी पुण्यामध्ये 1986 मध्ये राज्यभरातल्या विद्यार्थ्यांसाठी समाजकल्याण विभागातर्फे ही शाळा सुरु करण्यात आली. मुलांनी इथेच राहुन नीट शिक्षण घ्यावं हा हेतु. इथं राज्यभरातून आलेली मुलं राहतात. पण जिथे वर्गांचीच दुरावस्था तिथे ही मुलं राहत असलेल्या हॉस्टेलच्या खोल्यांची स्थिती आणखीनच बिकट आहे. यातल्या अनेक गोष्टींसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे मुख्याध्यापक सांगत असले तरी अनेक गोष्टींची त्यांनाही माहिती नाही. सर्व शिक्षा अभियानाचा डांगोरा पिटला जातोय. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सरकार ठराविक रक्कम खर्ची टाकतंय. पण या शाळेतल्या मुलांपर्यंत मात्र त्यातला रुपयाही पोहोचताना दिसत नाहीय हेच खरं.

close