‘राज’कारणाचा फुसका बार !

April 13, 2012 4:52 PM0 commentsViews: 5

13 एप्रिल

बिहार दिनाचा विरोध मनसेनं मागे घेणार आहे. मुंबईत जेडीयुच्या नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे रविवारी मुंबईत होणारा बिहार दिन साजरा होणार आहे. बिहार दिनाच्या मुद्यावरुन सुरु केलेल्या मनसे राजकारणाचा बार मात्र या बदलत्या भूमिकेमुळे फुसका ठरला आहे.

'मुंबईत बिहार दिन साजरा करुन दाखवाच' आणि 'सांस्कृतिक कार्यक्रमांना माझा विरोध नाही ' राज ठाकरेंची ही दोन विधानं…बिहार दिनाच्या मुद्यावरुन त्यांनीच रान पेटवलं आणि पेटणार्‍या वणव्यावर खुद्द राज ठाकरेंनीच पाणी टाकून त्याला शांत केलं. दरम्यान, जदयूचे नेते देवेश ठाकूर यांनी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यांचं नितीशकुमार यांच्याशी बोलणं करुन देऊन एकमेकांमध्ये संवाद घडवून आणला.

बिहार दिनाचा मुंबईतला कार्यक्रम हा अराजकीय आहे, त्यात सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत, तिथं कोणतंही राजकारण आणलं जाणार नाही, अशी ग्वाही नितीश कुमारांनी दिल्यानंतर राज ठाकरेंनी त्यांचा विरोध मागे घेतला.

मुंबईत बिहार दिनाचा कार्यक्रम अराजकीय करणार असल्याचं सांगत नितीश कुमार आजच्या दिवशी हिरो ठरले, तर याच मुद्यावरुन राजकारण तापवणारे राज ठाकरे यांनी ऐनवेळी त्यांची भूमिका बदल्याने ते झिरो ठरले.

close