मुंबईकर त्रस्त,सरकार सुस्त !

April 19, 2012 4:54 PM0 commentsViews: 3

19 एप्रिल

लोकलच्या सिग्नल यंत्रणेतल्या बिघाडीचा फटका दुसर्‍या दिवशीही सुमारे 25 लाख मुंबईकरांना सहन करावा लागला. लोकल गुरुवारीही उशिरानं धावत होत्या. त्यामुळे एखादी लोकल मिळाली तर लोक दरवाजात लटकून, टपावर चढून.. जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागला.

लोकल टाळायची म्हणून अनेकांनी रस्त्यावरून जाणं पसंत केलं. पण इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. लोकलनं झोडपलं. आणि रस्त्यानं अडवलं तर ऑफिसला जायचं कसं ? असा पश्न अनेकांना पडला. मुंबईकरांचे असे हाल सुरु असताना सरकार मात्र सुस्त होतं. आणि राज्य सरकारनं मुंबईला वार्‍यावर सोडलंय असा आरोप विरोधकांनी केला.

अर्धी मुंबई ठप्प झाली असताना.. केंद्र आणि राज्य सरकारकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही, म्हणून मुंबईकर नाराज आहेत. मुंबई मेट्रो आणि मोनोरेलची नुसती स्वप्न दाखवण्यात आली. पण या पर्यायी व्यवस्थांना अक्षम्य उशीर होतोय. त्यामुळे मुंबईचा विचार कुणी गांभिर्यानं करतंय का, असा प्रश्न मुंबईकर विचारत आहे.

close