स्मशानातलं सोनं !

April 24, 2012 4:47 PM0 commentsViews: 150

दिनेश केळुसकरसह शिवाजी गोरे, दापोली

24 एप्रिल

आज अक्षय्य तृतीया. आजच्या दिवसी सोन्याची खरेदी शुभ मानली जाते. पण सर्वसंपन्न महाराष्ट्रात स्मशानाच्या राखेतल्या सोन्यावर सुध्दा कुणाची तरी रोजी रोटी अवलंबून आहे हे ऐकून तुम्हाला आश्चर्यच वाटेल.! हो.! पण हे सत्य आहे. महाराष्ट्रातली वेंकी ही एक आदिवासी जमात आजही गावोगावच्या स्मशानातल्या राखेतून सोन्याचे कण शोधत आपली गुजराण करतेय. पण आता या राखेतही त्यांना सोनं मिळेनासं झालंय.

छन्नू दसरू झारीचं कुटुंब सकाळीच घराबाहेर पडतं ते स्मशानात जाण्यासाठी. कुणाच्यातरी मृतदेहाची राख आपल्याला मिळेल या आशेवर. झाडून झाडून राख गोळा करायची, ती चाळायची आणि त्यात दोन चार सोन्याचे कण मिळतात का ते पाहायचे..छन्नू झारीच्या जमातीचा हाच रोजीरोटीचा धंदा आहे.

छन्नू झारी म्हणतात, थोडाबहूत टाकतात, 100 मिली दोनशे मिली ते कधीतरी आम्हाला भेटून जातो. आणि आमी ते चोख करून सोनाराकडे विकतो.

पण आता सोनच एवढं महाग झालंय की, मढ्यावरचही थोडफार सोनंही काढून घेतलं जातं. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीचं कसं होईल याची चिंता छन्नूच्या पत्नीला वाटतेय.

शकुंतला झारी म्हणतात, दुसरा इलाजच नाय. आई बापापासनं चालत आलंय. पयले टाकायचे आता कोन टाकत नाय. आमचे दिवस गेले पन आता पोरांचे कसे जायचे दिवस.?

विदर्भातल्या बालाघाट जिल्ह्यातून स्थलांतरीत झालेले हे आदिवासी गेल्या तीन पिढ्यांपासून कोकणातल्या दापोली आणी आसपासच्या भागात राहतायत. छन्नूच्या मुलाला शिकायचंय. पण त्याच्यापर्यंत कुठला मदतीचा हातही अजून पोहोचलेला नाही.

बारकू झारी म्हणतात, आई बाबा दुसरी तिसरी शिकले असते तरी आम्ही पुढे जाऊन धावी पाचवी केलो असतो ना.! आता आमच्या हातात नोकरी बिकरी काय नाय एका ठिकाणी राहत नाय. हिकदं तिकडं ब्हाटकर रातावं, घर नाय दार नाय शेती नाय. आपलं कुठेतरी एक झोपडा टाकायचा आनि रहायचा.

तीन पिढ्या राखेवर जगणार्‍या या आदिवासींचं आयुष्य राखेतून कणभरही बाहेर आलेलं नाही.

close