औरंगाबादमधले भूखंड धनदांडग्यांच्या घशात

December 17, 2008 6:12 AM0 commentsViews: 1

17 डिसेंबर, औरंगाबादसंजय वरकडऔरंगाबाद महापालिकेच्या इतिहासातला सर्वात मोठा, भूखंड घोटाळा उघड झालाय. क्रांती चौकासारख्या मध्यवर्ती भागातले शंभर कोटीहून अधिक किंमत असलेले पाच एकरचे भूखंड श्रीमंतांनी धनदांडग्यांनी बळकावल्याचं एका चौकशीत समोर आलंय. आता हे सर्व भूखंड पुन्हा पालिकेच्या नावानं करण्यात आलेयत. पण ताबा मात्र खासगी मालमत्ता-धारकांकडेच आहे. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.सर्व आंदोलनांचं ठिकाण म्हणून ओळखला जाणारा औरंगाबादमधला क्रांतीचौक आता सर्वात मोठ्या भूखंड घोटाळ्यासाठी ओळखला जाईल. 1968 मध्ये तत्कालीन नगरपालिकेनं या भागातील सर्व्हे क्रमांक 54 मधली दोन लाख 44 हजार चौरस फूट जागा 23 जणांना लीज आणि कबालावर दिली. या सर्व व्यक्तींनी 1971 मध्ये नगरभूमापन विभाग, नगरपालिका व सर्व संबंधितांना हाताशी धरून या जागांवर स्वत:ची नावं लावली. खर तर लीज आणि कबाला म्हणजे तात्पुरत्या निवार्‍यासाठी दिलेली जागा. त्यावर कुणाचाही कायमस्वरूपी मालकी हक्क होऊ शकत नाही. तरीही मिळकतपत्र ( पीआर कार्ड ) तयार झाली. "सर्व्हे क्रमांक 54 ची जागा महापालिकेच्या मालकीची आहे. त्या जागेवर काही प्रोजेक्ट करू असा विचार माझ्या डोक्यात आला. मी माहिती घेतली असता या सर्व जागांवर खासगी व्यक्तींची नावं असल्याचं आढळून आलं. ही नाव कशी आली याचा आम्ही शोध घेतला, तेव्हा हा सर्व धक्कादायक प्रकार उघड झाला" अशी माहिती औरंगाबादचे विभागीय आणि महापालिका आयुक्त दिलीप बंड यांनी दिली.या प्रकरणाच्या चौकशीनंतर दिलीप बंड यांनी सर्व बोगस मिळकतपत्र रद्द ठरवून भूखंड महापालिकेच्या नावावर तर केलेत. कोट्यवधी किंमतीची ही जागा धनदांडग्यांनी बळकावल्याचं उघड होऊनही दहा वर्षे उलटली. पण महापालिका आणि नगरभूमापन विभागानं त्याची गंभीरपणे दखल का घेतली नाही ? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची गरज आहे.

close