जनता वार्‍यावर, राज्य ‘टँकर’वर !

May 4, 2012 4:59 PM0 commentsViews: 5

04 मे

राज्यातल्या सर्व भागांत टंचाईची परिस्थिती गंभीर बनली आहे. रत्नागिरीपासून जालन्यापर्यंत आणि नाशिकपासून सांगलीपर्यंत गावांमध्ये लोक आतूरतेनं टँकरची वाट पाहत आहेत.

दीडशे इंच पाऊस पडण्यार्‍या कोकणातही आता पाणी टंचाई तीव्र होत चाललीय. ही दृश्यं आहेत रत्नागिरीतल्या लांजा तालुक्यातल्या चिचूर्डी गावातली. सकाळी उठून तीन किलोमीटरची पायपीट करायची आणि दोन तीन तासांनी लहानश्या झर्‍यातून गोळा केलेलं फक्त हंडाभर पाणी घरी आणायचं. गेल्या 18 दिवसात या गावात फक्त 3 वेळाच टँकर आला आहे.

तर चिंचुर्डीच्या संतापलेल्या गावकर्‍यांनी पंचायत समितिसमोर हंडे घेऊन धरणं आंदोलन केलं. 40 कुटुंबं आणि 200 पाळीव जनावरं असलेल्या या वस्तीला पाण्याचा एका हंड्यासाठी रोज 10 किलोमीटरची पायपीट करावी लागतेय. तर तिकडे मराठवाड्यातही वाईट परिस्थिती आहे. जालन्यातल्या आनंदनगरमध्ये लोकांना पिण्याचं पाणी विकत घ्यावं लागतंय. इथे मंजूर झालेले टँकर मिळवण्यासाठी लोकांना अनेक दिवस वाट पाहावी लागतेय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशाचं पालन करत जालन्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा केला.

नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरजवळच्या काळमुस्ते गावात लोकांना चिखलाचं पाणी प्यावं लागतं, ही बातमी आयबीएन लोकमतनं दाखवली होती. त्यानंतर शुक्रवारी या गावात पंचायत समितीने टँकर पाठवलाय. यापूर्वी या गावात कधीच टँकर आला नव्हता. त्यामुळे इथल्या पडक्या विहिरीत उतरून बायकांना पाणी भरावं लागतं.

तर खुद्द शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे सध्या सांगली जिल्ह्‌यातल्या दुष्काळी दौर्‍यावर आहेत. ज्या 42 गावांनी पाणी टंचाईमुळे कर्नाटकात जायचा इशारा दिला होता, त्यातल्या काही गावांना ते भेट देणार आहे.

close