दुष्काळग्रस्तांनी घेतला शहराचा आसरा

May 8, 2012 6:03 PM0 commentsViews: 9

विनय म्हात्रे, नवी मुंबई

08 मे

वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यात दुष्काळाचं गंभीर संकट आहे. पाणी आणि रोजगार नसल्यानं लोक आता मुंबईकडे स्थलांतर करत आहेत.नवी मुंबईतल्या वाशीच्या उड्डाणपुलाखाली अशा जवळपास शंभर कुटुंबीयानी आश्रय घेतला आहे.

नीला कालापाड वाशिम जिल्ह्यातून दोन दिवसांपूर्वीच नवी मुंबईत आल्या. नीलाच्या पतीचा एक वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. घरची शेती नाही. त्यामुळे रोजंदारीशिवाय पर्याय नाही. त्यातच दोन मुलांची जबाबदारी…गावाकडे पडलेल्या दुष्काळामुळे तिनं मुंबईची वाट धरली.

नवी मुंबईतल्या वाशीच्या या फ्लायओव्हरखाली नीलाप्रमाणेच जवळपास 100 कुटुंबांनी हा असा उघड्यावर संसार थाटला आहे. वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या या सर्वांपुढचं संकट सारखंच आहे.

गावाकडे भीषण दुष्काळ पडला आहे. प्यायला पाणी नाही, हाताला काम नाही. त्यामुळे खायचं काय, हा प्रश्न यांना सतावतोय. लाखोंचं पोट भरणारी मुंबई आपल्यालाही रोजगार देईल, या आशेपोटी ते इथं आलेत. पण त्यांची ससेहोलपट थांबलेली नाही.

सोबत म्हातारी माणसं आणि लहान मुलं.गाठीला पैसा नाही…एक दिवस काम आणि चार दिवस थांब..अशा अवस्थेत फ्लायओव्हरच्या छताखाली हे दुष्काळग्रस्त आला दिवस ढकलत आहेत. त्यांना चिंता आहे उद्याची.

close