शिकार्‍यांच्या जाळ्यात वाघ !

May 18, 2012 5:51 PM0 commentsViews: 8

18 मे

भारताचा रुबाबदार प्राणी कसा शिकार्‍यांचं सावज बनला आहे. याची ही करुण दृश्यं आहेत. पण कहाणी इथेच संपत नाही. वाघांची शिकार करून त्यांची कातडी, वाघनखं, सुळे मिळवल्यानंतर त्यांचे मृतदेह रस्त्यावर टाकून दिलेले आढळत आहे. चंद्रपूरमध्ये आज आणखी एक वाघ शिकार्‍यांच्या जाळ्यात अडकला. चंद्रपूर – मूल मार्गावर या वाघाची हत्या झाली आहे. गेल्या तीन महिन्यांतला वाघाचा हा सातवा बळी आहे. तस्करीसाठीच ही शिकार झाल्याचा वनाधिकार्‍यांचा अंदाज आहे.

आतापर्यंत वाघांच्या शिकारीच्या घटनांवर नजर टाकली तर ताडोबा अभयारण्य आणि चंद्रपूरमधल्या वनक्षेत्राला शिकार्‍यांनी लक्ष्य केलंय हे उघड आहे. वाघांची शिकार करणार्‍या बहेलिया जमातीला 25 वाघांच्या शिकारीची ऑर्डर मिळाल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी राज्य सरकारला दिला होता. त्यासाठी 40 लाख रुपयांची आगाऊ रक्कम शिकार्‍यांना देण्यात आल्याची खबरही मिळाली होती. या हाय अलर्टनंतर वाघांच्या क्षेत्रातल्या पाणवठ्यांवरची गस्त वाढवण्यात आली होती. पण तरीही शिकार्‍यांनी संधी साधली आहे. या उन्हाळ्यात आपण आतापर्यंत विदर्भातले सात वाघ गमावून बसलोय. ही अनिर्बंध शिकार आपण रोखू शकलो नाही तर राजस्थानच्या सारिस्का अभयारण्यातून वाघ नाहीसे झाले तशीच वेळ चंद्रपूरच्या जंगलावरही येऊ शकते.

close