आता समाज ‘आई’ बनेल का ?

May 26, 2012 3:55 PM0 commentsViews: 128

शशी केवडकर आणि अलका धुपकर, बीड26 मे

बीड जिल्ह्यात परळीमधल्या डॉ. मुंडे हॉस्पिटलमध्ये विजयमाला पटेकर यांचा गर्भपातावेळी मृत्यू झाला. त्यांच्या पोटात 16 – ते 20 आठवड्यांचा गर्भ होता. विजयामाला पटेकर यांच्या 11 ते 2 वर्षांच्या 4 मुली आता अनाथ झाल्या आहेत. स्त्री भ्रूण हत्येच्या घटनेनं या चौघींचं मायेचं छप्पर उद्धस्त झालंय.

भारुड तालुक्यातलं ऊस तोडणी मजुराचं हे कुटुंब. या कुटुंबाचा कमावता महादेव पटेकर पोलीस कोठडीत आहे. तर कोयतं बनून त्याच्यासोबत राबणारी विजयमाला…. मृत्यू पावलीय.त्यामुळे आज या घरात कमावते हातच उरले नाही.

कोणी ज्वारी देत, कोणी बाजरी, घराचे पत्रे विकेन पण मुलींना शिकवेन असा विश्वास विजयमालाची सासू नीलाबाई पटेकर यांनी व्यक्त केला.गावाने दिलेल्या मदतीवर म्हातारं पटेकर कुटुंब चार मुलींना सांभाळतंय. या म्हातार्‍या आजी-आजोबांना या मुलींच्या आधारीची काठी बनावं लागतंय. मुलींचं शिक्षण, आजारपण आणि भविष्याच्या खर्चाची तजवीज कशी करायची हा प्रश्न त्यांच्यापुढं आ वासून उभा आहे.

सामाजिक कार्यकर्ते एकनाथ आव्हाड म्हणतात, या निरक्षर मुलींची आई समाजाने बनलं पाहिजे.

गर्भलिंग निदानाच्या गुन्ह्यातल्या दुष्परिणामांनी या कोवळ्या मुलींचं आयुष्यच होरपळून निघालंय. कुटुंबनियोजनाचं शिक्षण नाही आणि मुलाचा हव्यास.. याला जोड मिळाली ती अठरा विश्वे दारिद्र्याची. महादेववरचा खटला तर चालत राहील पण मुलींचं शिक्षण आणि बालपण मात्र या घटनेमुळे थिजून जाता कामा नये. स्री भ्रणू हत्येसाठी लढणारा संवेदनशील समाज या मुलींसाठी मदतीचा हात पुढे करील का ?

दरम्यान, पटेकर दाम्पत्याच्या या अनाथ मुलींची व्यथा आयबीएन लोकमतनं मांडल्यानंतर आता त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे आला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानं या 4 मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. जागर हा जाणीवांचा या उपक्रमांतर्गत त्यांना मदत केली जाणार आहे. यासाठी खा. सुप्रिया सुळेंनी मदतीचा हात दिला आहे.

close