राष्ट्रपती आणि राजकारण

June 13, 2012 5:10 PM0 commentsViews: 51

13 जून

राष्ट्रपती पदासाठी रस्सीखेच आता सुरू झाली आहे. राष्ट्रपतीपद हे देशाचं सर्वोच्च पद असतं. शिवाय ते कुठल्याही पक्षाचं पद नाही. तरीही गेल्या काही दशकांपासून या पदाच्या निवडणुकीला राजकीय रंग चढतोय. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि झाकीर हुसेन.. स्वतंत्र भारताचे पहिले तीन राष्ट्रपती. या तिघांचंही कर्तृत्व इतकं मोठं की हे सर्व बिनविरोध राष्ट्रपतीपदी विराजमान झाले.

पण या पदासाठी खरी रस्सीखेच सुरू झाली ती 1969 पासून. इंदिरा गांधींनी राष्ट्रपतीपदासाठी कामगार नेते व्ही. व्ही. गिरी यांचं नाव पुढे केलं आणि इथूनच राष्ट्रपती निवडणुकीला राजकीय रंग चढला.

गिरी यांच्यानंतर राष्ट्रपती झाले फखरुद्दीन अली अहमद.. फखरुद्दीन अली अहमद यांनीच आणीबाणीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आणि अतिशय मानाचं असलेल्या राष्ट्रपतीपदाला कधी न पुसला जाणारा कलंक लागला.

यानंतर इंदिरा गांधी यांनी पुन्हा एकदा आपल्या पसंतीचा उमेदवार राष्ट्रपतीपदासाठी निवडला. हे होते ग्यानी झैल सिंग… शिखांमध्ये उफाळलेला असंतोष शमवण्याचा इंदिरा गांधींचा हा प्रयत्न होता. आणि याच काळापासून राष्ट्रपतीपदाला जातीय रंग चढला.

ग्यानी झैल सिंग यांच्यानंतरचे सगळे राष्ट्रपती हे पॉलिटीकली करेक्ट उमेदवार होते. अनेकांची पार्श्वभूमी ही काँग्रेसची होती. अंतिम निवडीत जात आणि धर्म याचाही विचार व्हायला लागला. के. आर. नारायणन हे पहिले दलीत राष्ट्रपती होते. तर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती बनवून भाजपनंही मुस्लिमानुनय करण्याचा प्रयत्न केला. प्रतिभा पाटील या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या. पण त्या महिला आहेत म्हणून राष्ट्रपती झाल्या की काँग्रेस हायकमांडशी प्रामाणिक असल्यामुळे, ही चर्चा अजूनही सुरू आहे.

close