नाशिक जिल्ह्यात वस्तीशाळा शिक्षकांकडे सरकारचं दुर्लक्ष

December 17, 2008 10:55 AM0 commentsViews: 68

17 डिसेंबर, सटाणाजयंत खैरनारवाड्यावस्त्यांवर शिक्षण पोहोचवल्याचा गवगवा खूप झाला. पण त्यासाठी राबणार्‍या वस्तीशाळा शिक्षकांच्या पदरी मात्र निराशाच आली आहे. शेवटचा उपाय म्हणून यंदाच्या हिवाळी अधिवेशनात या शिक्षकांनी धरणे आंदोलन छेडलं आहे. सुनिता भामरे गेल्या चार वर्षांपासून हा पाठ गिरवताहेत. तहाराबादच्या वस्तीशाळेत शिक्षिका म्हणून लागलेल्या सुनिताताईंच्या सरकारकडून अत्यंत माफक अपेक्षा होत्या. पूर्ण पगार मिळावा, शाळेसाठी खोली मिळावी आणि रहाण्यासाठी एक खोली मिळावी. पण एवढ्या माफक अपेक्षाही सरकारनं पूर्ण केलेल्या नाहीत.सुनितांताईंसारख्या बर्‍याच अपंगांची भरती वस्तीशाळांमध्ये शिक्षक म्हणून शासनानं केली आहे. स्वत:च्या व्यंगावर मात करून ही मंडळी मुलांच्या शिक्षणासाठी धडपडतात. आणि त्यासाठी शासन त्यांना देतं अवघं दीड हजार रुपये मानधन. आणि ते पण चारचार महिन्यांची वाट पाहिल्यावर. असे तब्बल 8 हजार शिक्षक राज्यातल्या वस्तीशाळांवर मानधनावर शिकवत आहेत.ही परिस्थिती बदलण्यासाठी यांनी बरेच प्रयत्न केले. दरम्यान, शिक्षणमंत्री बदलले, मुख्यमंत्री बदलले पण शिक्षकांची परिस्थिती तशीच आहे. "आम्ही अनेक आंदोलनं, उपोषणं केली, मुख्यमंत्र्यांनी, शिक्षणमंत्र्यांनी आश्वासनं दिली होती पण त्यांनी वस्ती शाळा शिक्षकांच्या तोंडाला पानं पुसली" असं जिल्हा परिषद वस्तीशाळा शिक्षक संघाचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी सांगितलं.आजच्या जगात उपेक्षितांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, अशी ओरड नेहमीच केली जाते. पण आपला स्वार्थ बाजूला ठेऊन काम करणार्‍या वस्तीशाळांमधील शिक्षकांच्या वाट्याला मात्र उपेक्षाच येत आहे. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात तरी आपल्याला न्याय मिळावा, अशीच त्यांना आशा आहे.

close