गँग्ज ऑफ मालेगाव

June 29, 2012 3:11 PM0 commentsViews: 27

29 जून

या आठवड्यातली बॉक्स ऑफिसवरची अतिशय महत्त्वाची घटना म्हणजे मालेगाव के सुपरमॅन ही डॉक्युमेंटरी रिलीज होतेय. हे प्रथमच घडतंय, मोठ्या पडद्यावर डॉक्युमेंटरी बघायची संधी फिल्म फेस्टीव्हल्समध्ये मिळते पण डॉक्युमेंटरीचं सिनेमासारखं रिलीज कदाचित पहिल्यांदाच होत असावं..एक तासाची ही डॉक्युमेंटरी म्हणजे मालेगावमधल्या फिल्म इंडस्ट्रीची अर्थात मॉलीवूडची कहाणी आहे. सिंगापूरमधल्या डॉक्युमेंटरी कंपनीत काम करणार्‍या फैजा अहमद खान हिने या डॉक्युमेंटरीचं दिग्दर्शन केलेलं आहे. मॉलीवूडमध्ये जेव्हा मालेगाव का सुपरमॅन हा सिनेमा बनत होता तेव्हा त्या पूर्ण प्रक्रियेचं चित्रण फैजा अहमदनं आपल्या या डॉक्युमेंटरीमध्ये केलेलं आहे. फक्त मॉलीवूडच नाही तर मालेगावची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती, इथं असलेलं सिनेमाचं वेड, स्त्रियांना मिळणारी दुय्यम वागणूक, हे सगळं या एक तासाच्या डॉक्युमेंटरीमध्ये अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आलंय.

सिनेमा बनवणं हा एक जुगार आहे असं सर्रास म्हटलं जातं, बॉलीवूडमध्ये एवढं मोठमोठे सिनेमे बनवणारे निर्माते-दिग्दर्शकही असंच मानत असतात, पण ज्या मालेगावमध्ये सुविधा नाहीत, बजेट कमी आहे अशा ठिकाणी एवढा मोठा जुगार खोळणा-या धडपड्या, जिंदादिल शेख नसिरची ही गोष्ट आहे. हा नासिर जो आहे तो लेखक आहे, दिग्दर्शक आहे, कॅमेरामन आहे अगदी स्पेशल इफेक्टसाठीसुध्दा तोच डोकं चालवतो. त्याच्यासोबत जे आहेत, त्यांच्यासोबत तो अख्ख्या सिनेमाचा डोलारा सांभाळतो. या नसीरनं जागतिक सिनेमाचा जमेल तसा अभ्यास केलाय, प्रेक्षकांना नेमकं काय आवडतं हेसुध्दा त्याला पक्कं ठाऊक आहे, ही डॉक्युमेंटरी त्याच्याच या मेहनतीची कहाणी आहे.

close