गडकरींच्या मुलाच्या लग्नाचं रिसेप्शन वजा शक्तीप्रदर्शन !

July 3, 2012 5:19 PM0 commentsViews: 4

03 जुलै

भाजप अध्यक्ष नितीन गडकरींनी त्यांच्या दुसर्‍या मुलाच्या लग्नाचं रिसेप्शन मोठ्या थाटामाटात पार पडलं. किंबहुना दिल्लीत गडकरींनी या रिसेप्शनच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शनच केलं, असं म्हटलं जातंय.

निळ्या गुलाबी रंगाची ही मंद रोषणाई…. फुलांची आरास आणि पाहुणेही खास…. भाजप अध्यक्ष नितीन गडकरींच्या मुलाचं खास दिल्लीकरांसाठी ठेवलेलं हे रिसेप्शन….देशातला एवढा मोठा पक्ष…आणि नितीन गडकरी त्याचे अध्यक्ष….एरव्ही दिल्ली भाजपची मंडळी त्यांना गॉसिप कट्‌ट्यावर चिडवतात…विधानपरिषदेतला अध्यक्ष म्हणून…शेवटी ह्या चौकडीला अपनी भी कुछ पहँुच है हे दाखवायचं…ह्या इराद्यानं गडकरी भिडले. मुलाच्या रिसेप्शनची रावापासून गावापर्यंत आवताणं केली. बोलावलेले सगळे येतायत बघितल्यावर गडकरींच्या चेहर्‍यावर त्यांच्यासारखंच भरगच्च हसू पसरलं. आल्या गेल्याला मान द्यायला मग त्यांनी कंबर कसली. आधी आले त्यांच्यासारखेच महाराष्ट्राचे दुसरे राष्ट्रीय नेते शरद पवार..गडकरी आनंदाने कमरेतून वाकले…स्वयंसेवक पवारांसमोर झुकले म्हणून थोडी कुजबूज झाली.

पण, अडवाणींसमोरही तसंच वाकून त्यांनी ती कुजबुज बंद केली. सोनिया गांधींना बोलावलं होतं. मॅडम आल्या नाहीत पण, देशाचे पंतप्रधान आले. सगळ्यांच्या भुवया आणखी उंचावल्या. जेव्हा गडकरींचे नवे दोस्त नरेंद्र मोदीही हजर झाले. येणार्‍या लोकसभा निवडणुकीपर्यंत ही दोस्ती आणखी घट्ट होणार ह्याचीच ही खात्री..विलासराव पण आले तेव्हा गडकरींची आणि त्यांची कशी आयडीयल दोस्ती आहे हे जाणकारांनी इतरांना समजावून सांगितलं. पण, राजकारणासोबत नितीनभौचे बाकीही काही दोस्त आहेत. आता आपले मुकेशभाई अंबानी. अगदी घरचेच असल्यासारखे गडकरी कुटूंबाला भेटले. हल्ली ज्यांच्याबद्दल अनेकांना आस्था वाटते ते रामदेव बाबाही भेटले. बाबांच्या अनेक योगकला येत्या काळात गडकरींना कामी येणार आहेत. गडकरींना अध्यक्षपदाची पहिली टर्म मिळाली तेव्हा त्यांनी पहिल्या मुलाचं असंच धडाक्यात लग्न केलं होतं…आता दुसरी मिळाली तर दुसर्‍याचं लग्न केलं. 2014 ला भाजपचं सत्तेशी लग्न लागलंच तर, घोड्यावरची मांड आपलीच हवी म्हणून गडकरींनी काय तयारी चालवलीय त्याचीच ही झलक…

close