धोबीपछाड देण्यासाठी कुस्तीपटू सज्ज

July 11, 2012 3:25 PM0 commentsViews: 55

विनायक गायकवाड, मुंबई

11 जुलै

लंडन ऑलिम्पिकमध्ये मेडलच्या सर्वाधिक अपेक्षा आहेत त्या शुटिंगकडून… आणि त्यानंतर नंबर लागतो तो कुस्तीचा.. एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्डन कामगिरी करत या कुस्तीपटूंनी आपली गुणवत्ता आधीच सिध्द केलीय आणि आता ते सज्ज झालेत लंडन ऑलिम्पिकसाठी… ऑलिम्पिक ब्राँझ मेडल विजेता सुशील कुमारसह पाच जणांची टीम लंडन ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे.

बीजिंग ऑलिम्पिकमधला हा क्षण, कुस्तीपटू सुशीलकुमारने 66 किलो वजनी गटात भारताला ब्राँझ मेडल मिळवून दिलं आहे. 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी ब्राँझ मेडल पटकावल्यानंतर तब्बल 56 वर्षांनी भारताला कुस्तीत दुसरं मेडल मिळालं.

सुशील कुमारला क्वार्टर फायनल राऊंडमध्ये युक्रेनच्या अँड्री स्टेडनिकने हरवलं. तेव्हा असं वाटलं की सगळचं संपलं. प्रतिस्पर्धी स्टेडनिक फायनलला पोहोचला. पण रेपिचाज राऊंडमध्ये सुशीलनं आपली कमाल दाखवली. सुशीलनं रेपिचाजच्या तीनही राऊंड्समध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत ब्रांॅझ मेडल पटकावलं.सुशीलकुमारच्या या विजयानं भारतात कुस्तीला पुन्हा चांगले दिवस आले. 2010 मध्ये सुशीलने जागतिक कुस्ती स्पर्धा आणि त्यानंतर कॉमनवेल्थमध्ये गोल्ड मेडल पटकावत आपला दबदबा कायम ठेवलाय. आता लंडन ऑलिम्पिकमध्येही सुशीलकुमारकडून मेडलची अपेक्षा बाळगली जातेय.

सुशीलकुमारबरोबरच लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वर दत्त, नरसिंग यादव आणि अमित कुमार यांच्यावरही भारताची मदार असणार आहे. सुशीलबरोबर योगेश्वर दत्तही 2008च्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला होता. 2010 च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत गोल्ड मेडलची कामगिरी करत योगेश्वरनं लंडन ऑलिम्पिकचं तिकिट मिळवलंय.

मुंबईचा युवा कुस्तीपटू नरसिंग यादवचं ऑलिम्पिकचं स्वप्नही सत्यात उतरलंय. 2010 च्या कॉमनवेल्थ गेममध्ये अखेरच्या क्षणी भारतीय टीममध्ये नरसिंगला संधी मिळाली आणि नरसिंगने थेट गोल्ड मेडल पटकावत आपल्यावरचा विश्वास सार्थ ठरवला.

भारतीय कुस्ती टीममधला आणखी एक युवा खेळाडू म्हणजे अमित कुमार, आशियाई पात्रता फेरीत गोल्ड मेडल पटकावत लंडन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला अमित कुमार हा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला होता.

चांगल्या सोयी सुविधा नसतानाही या कुस्तीपटूंनी देशाचं नावं उज्ज्वल करण्याचं ध्येय बाळगलंय. भारताच्या या कुस्तीपटूंनी आपली गुणवत्ताही सिद्ध केलीय. त्यामुळे आता भारतीय क्रीडाप्रेमींना प्रतीक्षा आहे ती ऑलिम्पिकमध्ये कुस्तीतल्या पहिल्या गोल्ड मेडलची.

close