शालेय पोषण आहाराचा उडाला बोजवारा

July 14, 2012 11:19 AM0 commentsViews: 118

बालाजी निरफळ, उस्मानाबाद

14 जुलै

उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेतल्या शालेय पोषण आहाराचा पुरता बोजवारा उडाला आहे. शाळा सुरु होऊन महिना उलटला तरी, अजूनही विद्यार्थ्यांना हा आहार मिळत नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांचा कामचुकारपणा यातून समोर आला आहे.

जिल्ह्यात शालेय पोषण आहाराचा लाभ घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 489 इतकी आहे. जिल्हा परिषद आणि इतर अनुदानित शाळेतल्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 742 मेट्रीक टन तांदूळ मंजूर झाला. तो पुणे विभागाकडून जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आला. पण तो अजूनही शाळेत पोहचला नाही.

शाळेत विद्यार्थी संख्या वाढावी म्हणून सरकारने ही शालेय पोषण आहार योजना सुरु केली. काही विद्यार्थी घरुन डबा आणतात, तर काहीची परिस्थिती हलाखीची असल्यानं ते आहारावर अवलंबून असतात. अशात आता आहारच पोहचला नसल्याने विद्यार्थ्याचा पोटमारा होतोय. हा आहार सगळीकडे पोहचल्याचं सांगत, त्याबाबत तक्रार आली नसल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे.

खाजगी शाळेत गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश घेणं कठीण असतं. जिल्हा परिषद शाळेमधली विद्यार्थी पटसंख्या वाढावी म्हणून, ही योजना सुरु झाली, पण त्याचा असा बोजवारा उडाला आहे.

close